स्मार्ट सिटी बस प्रवाशांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:03 AM2021-01-25T04:03:51+5:302021-01-25T04:03:51+5:30
बससेवेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एएससीडीसीएल बस विभागाने औरंगपुरा, सिडको, महावीर चौक, रेल्वे स्टेशन आणि रांजणगाव येथे नागरिकांशी संवाद साधला. ...
बससेवेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त एएससीडीसीएल बस विभागाने औरंगपुरा, सिडको, महावीर चौक, रेल्वे स्टेशन आणि रांजणगाव येथे नागरिकांशी संवाद साधला. याशिवाय स्मार्ट सिटी बस विभागातर्फे मुकुंदवाडी बस डेपो येथे शहर बसचे चालक, वाहक आणि मेकॅनिकसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कॉर्पोरेट प्रशिक्षक नदीम पाशा यांनी कर्मचाऱ्यांना प्रवासी सुरक्षा व सहकार्याचे महत्त्व पटवून दिले. स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भुसारी, उपव्यवस्थापक ललित ओस्तवाल, विशाल खिल्लारे, सिध्दार्थ बनसोड, विलास काटकर, डी. आर. रावते, माणिक निला उपस्थित होते.
२४ हजार रुपये दंड वसूल
औरंगाबाद : महापालिकेने नेमलेल्या नागरी मित्र पथकाने शनिवारी २४ हजार २५० रुपये दंड वसूल केला. मास्क न वापरणे, रस्त्यावर कचरा, कॅरिबॅगचा वापर आदी कारणांसाठी दंड आकारण्यात येत आहे.
महापालिका मुख्यालयात रंगरंगोटीचे काम
औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाने शनिवारपासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
सिडको-हडकोतील पाणीपुरवठा पूर्ववत
औरंगाबाद : महावितरण कंपनीने शुक्रवारी सिडको हडको भागात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रांवर दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी विविध वसाहतींना पाणी देण्याचे काम सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
टँकरच्या मागणीत हळूहळू वाढ
औरंगाबाद : शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतीमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. थंडी संपताच पाण्याच्या मागणीत हळूहळू वाढ होत आहे. महापालिकेला टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.
कचरा दोन दिवस पडून राहतो
औरंगाबाद : कचरा संकलनासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या रिक्षा काही वसाहतींमध्ये दोन ते तीन दिवस कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कचरा बाहेर आणून टाकावा लागतो. अनेक ठिकाणी कंपनीकडून डोअर टू डोअर कलेक्शन होत नाही.
कटकट गेट येथील रस्त्याची अवस्था वाईट
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ऐतिहासिक कटकट गेटची डागडुजी करण्यात येत आहे. गेटच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. दुचाकी चारचाकी वाहनधारकांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.
पावसाच्या पाण्याचा निचरा होणारच नाही
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधी अंतर्गत सावरकर चौक ते सिल्लेखाना रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून सुरू असलेले काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. रस्ता एकीकडे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे ठिकाण दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.