गुलाबपुष्पाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
By Admin | Published: June 16, 2014 12:25 AM2014-06-16T00:25:02+5:302014-06-16T00:26:31+5:30
नांदेड : नवा गणवेश़़़नवे पुस्तके़़़नवीन बॅग अन् नवे सवंगडी सोबतीला घेऊन शाळेला चाललो आम्ही़़़ असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकले प्रवासी हसत बागडत शाळेला निघणार आहेत़
नांदेड : नवा गणवेश़़़नवे पुस्तके़़़नवीन बॅग अन् नवे सवंगडी सोबतीला घेऊन शाळेला चाललो आम्ही़़़ असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकले प्रवासी हसत बागडत शाळेला निघणार आहेत़ शहरातील शाळा सोमवारपासून सुरू होत आहेत़ शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत़
उन्हाळ्याच्या सुट्यांची मौज घेतलेल्या मुलांना आता शाळेचे वेध लागले आहेत़ पहिल्या पावसाच्या सरींना अंगावर झेलण्यासाठी आतुरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नव्या पुस्तकांचा गंध दरवळत आहे़ परीक्षेनंतर दुरावलेल्या मित्रांच्या गाठीभेटी, उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद कसा घेतला हे सांगण्यासाठी मुले उत्सुक झाले आहेत़ दोन महिन्यांपासून एकांत सहन करणाऱ्या शाळेचे प्रांगण आता मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहे़
शहरातील जिल्हा परिषद, शासन अनुदानित आणि महापालिकेच्या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार असून जि़ प़ व मनपा शाळेतील मुली तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या मुलांना मोफत गणवेश वितरित केले जाणार आहेत़ शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रथमच शाळेत जाणाऱ्या तसेच पुढच्या वर्गात जाणाऱ्या या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे़ महापालिका शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या अडीच हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि १ हजार ५६५ विद्यार्थ्यांना सोमवारीच गणवेशाचे वितरण केले जाणार आहे़ शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचेही यावेळी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे़
महापौर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते व मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली जंगमवाडी शाळेत सकाळी ११ वाजता, वजिराबाद शाळेत दुपारी १२ वाजता आणि खय्युम प्लॉट शाळेत दुपारी १ वाजता हा समारंभ आयोजित केला आहे़ शहरात मनपाच्या १७, जिल्हा परिषदेच्या ३४ आणि खाजगी अनुदानित २२१ अशा एकूण २७२ शाळांमधील पहिली ते आठवीच्या ८४ हजार विद्यार्थ्यांना मोफत वितरण करण्यासाठी संबंधित शाळेकडे ५ लाख ५ हजार ५७८ पुस्तके सुपूर्द केल्याची माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी भागवत जोशी यांनी दिली़ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या ३४ आणि मनपाच्या १७ अशा एकूण ५१ शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या ३ हजार ५३२ मुली, अनुसूचित जातीची १ हजार ३५७ तर अनुसूचित जमाती संवर्गातील १४८ मुले याप्रमाणे एकूण ५ हजार ३७ विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन मोफत गणवेशापोटी २० लाख १४ हजार ८०० रूपयांची रक्कम संबंधित शालेय व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आली आहे़ मनपा क्षेत्रातील जि़प़ शाळांमध्ये गणवेश वितरण येत्या १५ आॅगस्टपूर्वी करण्याची तयारी संबंधित शाळांनी दाखविल्याचे जोशी यांनी सांगितले़