रस्त्यावर गुंडगिरी कराल, तर ठाण्यात जाईल नववर्षाची पहाट; पोलिसांची चौकाचौकात नाकाबंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:46 IST2024-12-31T11:53:14+5:302024-12-31T12:46:49+5:30
नववर्षाचे स्वागत जल्लोषात, पण जबाबदारीने करा; छत्रपती संभाजीनगरात आज रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत दीड हजार पोलिस रस्त्यावर

रस्त्यावर गुंडगिरी कराल, तर ठाण्यात जाईल नववर्षाची पहाट; पोलिसांची चौकाचौकात नाकाबंदी
छत्रपती संभाजीनगर : आज मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करणार असाल, तर जबाबदारीने करा. कारण, शहर पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने टवाळखोर, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे. रात्री ८ वाजेपासून पहाटे ५ पर्यंत १२०० पोलिस रस्त्यांवर ठिकठिकाणी तैनात असणार आहेत. शिवाय, प्रमुख १८ चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहन, चालकांची तपासणी होणार आहे.
गेल्या आठवड्यापासून नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह मोठ्या लॉन्सवर रोषणाई, आकर्षक सजावटीसह पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान, कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, महिलांची छेडछाड, गैरप्रकार टाळण्यासाठी शहर व जिल्हा पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाने काटेकोर नियोजन केले आहे.
-जवळपास ११०० पेक्षा अधिक हॉटेल, रेस्टॉरंट्स, बारमध्ये जंगी पार्ट्यांचे आयोजन.
-शासनाच्या आदेशानुसार, वाइनशॉप मध्यरात्री १, तर रेस्टारंट, परवाना असलेले बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.
-मध्यरात्री १२ वाजेपर्यंत स्पीकरवर गाणे वाजवण्यास परवानगी.
-मध्यरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतषबाजीसाठी लाखो रुपयांच्या फटाक्यांची खरेदी.
-देश पातळीवरील डीजे, गायक, वादकांच्या सादरीकरणाचे आयोजन.
असा असेल बंदोबस्त
- ६८ संवेदनशील ठिकाणी फिक्स पाॅइंट
- १८ महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी
- ५० पेक्षा अधिक वाहनांतून पोलिसांची फिरती गस्त
- गुन्हे शाखा, विषेश शाखेचे साध्या वेशात १० पथके.
- ३ पोलिस उपायुक्त, ६ सहायक आयुक्तांसह जवळपास १०० अधिकारी व १२०० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात.
बीडबायपास, केंब्रिज चौक, दौलताबाद परिसरात आयोजन अधिक
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आता शहरातही प्रसिद्ध डीजे वादक, गायकांच्या ग्रुपला आमंत्रित करून पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. बीडबीपास, नव्याने झालेला सोलापूर धुळे महामार्ग, केंब्रिज चौक ते शेंद्रा, चिकलठाणा एमआयडीसी, दौलताबाद परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वाद टाळण्यासाठी केवळ ‘कपल एंट्री’ संकल्पना म्हणजेच गटात महिला, तरुणी असल्यावरच प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
मद्य परवाना नसलेले ढाबे, हॉटेल टाळा
-दारूची अवैध विक्री, परवाना नसताना हॉटेल, ढाब्यावर दारू पुरवठा व सेवन करणाऱ्यांवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सक्त सूचना केल्या आहेत.