ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ
By Admin | Published: November 24, 2014 12:07 AM2014-11-24T00:07:54+5:302014-11-24T00:36:31+5:30
बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड वाहतूक कामगारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी
बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड वाहतूक कामगारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे सेके्रटरी प्रा. सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.
२० नोव्हेंबर रोजी मुंबई येथे साखर महासंघाच्या कार्यालयात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व साखर महासंघाचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत सहकारमंत्री पाटील यांनी स्व. गोपीनाथ मुंडे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती प्रा. जाधव यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी सीटू संघटना गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांवर झगडत आहे. अनेक मागण्यांपैकी महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी व वाहतूक करणाऱ्यांना मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. लेव्हीमधील एक टक्का सेस कल्याणकारी महामंडळाला दिल्यास मोठा निधी प्राप्त होईल. त्यामुळे त्यांचे आर्थिक प्रश्न निकाली निघतील. बैलगाडीतून ऊसवाहतूक करणाऱ्यांना पहिल्या किलोमीटरसाठी ७० रूपये ६० पैसे दिले जातात. हे दर दुप्पट करायला हवेत, असे त्यांनी सांगितले. मुकादम कमिटीचे कमिशन साडेबावीस टक्के करावे, त्यांचा वीमा शासनाने भरावा या मागण्या त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)