बरंंय, सरकारने आमचा विचार तर केला; ७५ वर्षावरील ज्येष्ठांना बसमध्ये मोफत प्रवासाला सुरूवात
By योगेश पायघन | Published: August 27, 2022 11:47 AM2022-08-27T11:47:19+5:302022-08-27T11:47:59+5:30
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली.
औरंगाबाद -‘ज्येष्ठांना कुणी विचारत नव्हतं बरंय सरकारने तरी आमचा विचार केला. प्रवास मोफत केला. आता उपचारही मोफत करा’ अशा भावना मध्यवर्ती बसस्थानकात एसटी बस मधून उतरल्यावर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अर्थात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत योजनेचा प्रत्यक्ष लाभ शुक्रवार पासून मिळायला सुरूवात झाली. मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या बस वाहक म्हणाले, एक दोन प्रवास्यांना लाभ दिला. पण त्यांचा प्रवास एक दोन टप्प्याचाच होता. विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानक येथे वृक्षरोपणकरून या योजनेची माहीती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक संतोष घाने, विभागीय अध्यक्ष बाबासाहेब साळुंके पाटील, विजय पारखे, ललित शहा, संतोष नजन, दिपक बिराजदार, दिपक बागलाने, अंजली राऊत, कविता पिसोटे, अनिता सोंगिरे आदीसह वाहच, चालक, कर्मचारी उपस्थित होते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी....
२६ ऑगस्ट १९४७ पुर्वी जन्मलेल्या तसेच ७५ वर्षावरील व्यक्तींना मोफत प्रवासासाठी आधार कार्ड, जन्मतारीख आणि पत्ता असलेले केंद्र, राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी दिलेले ओळख पत्र, पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड, तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र, रा.प. महामंडळाचे स्मार्टकार्ड, डीजी लाॅकर, एम आधार ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार असल्याचे सहाय्यक वाहतुक निरीक्षक बाबासाहेब साळुंके यांनी सांगितले. राज्यातील हद्दीत बसप्रवासाची ही योजना असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवास असला तरी ऑनलाईन आरक्षण, विंडो बुकींग, मोबाईलवरून बुकींसाठी आरक्षण शुल्क द्यावे लागणार आहे. योजना लागू होण्यापुर्वी आगावू आरक्षण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा देवून जवळच्या आगारात रक्कम परत मिळवता येणार आहे.
७० वर्ष करावे
रायपुरहून सकाळी बसने आलो. माझे वय ७० आहे म्हणून मला मोफत प्रवासाची सवलच मिळाली नाही. मात्र, चांगली योजना आहे. ७५ एवजी ७० वर्षावरील व्यक्तींसाठी ही योजना करावी म्हणजे अधिक ज्येष्ठांना लाभ मिळाला असता.
-देविदास बांडे, ज्येष्ठ नागरिक प्रवासी (रायपुर ता. जि. बुलडाणा)
सिटी बसमध्ये लागू करा
चौका येथून आले तर प्रवासाला पैसे लागले नाही. सर्व बसमध्ये योजना लागू म्हटले. मात्र, सिटी बसमध्ये ही योजना नाही. तीही बसच आहे. त्यात का लाभ मिळत नाही. बरंय, कुणी विचारत नव्हते. शासन आमचा विचार करतेय तेवढंच समाधान.
-अनुसया गायकवाड, ज्येष्ठ नागरिक प्रवासी, चौका