‘गिरिजा’तील विहिरींना लागले मुबलक पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:11 AM2018-01-16T00:11:50+5:302018-01-16T00:12:03+5:30
गिरिजा प्रकल्पातील चार विहिरींचे पाणी कमी झाल्याने खुलताबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने गिरिजा नदीत तातडीने तीन बुडकी विहिरी खोदल्या असून त्यांना मुबलक पाणी लागल्याने खुलताबादकरांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : गिरिजा प्रकल्पातील चार विहिरींचे पाणी कमी झाल्याने खुलताबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने गिरिजा नदीत तातडीने तीन बुडकी विहिरी खोदल्या असून त्यांना मुबलक पाणी लागल्याने खुलताबादकरांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.
खुलताबाद शहराला तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणी जमा झाले.
परंतु सदरील प्रकल्प नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडल्याने गिरिजा मध्यम प्रकल्पातील नगर परिषदेच्या चार विहिरींचे पाणी एकत्र करून चार दिवसाआड खुलताबादकरांना पाणीपुरवठा करण्यात येत होता.
परंतु या विहिरींचे पाणी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तळाला गेल्याने शहरवासियांना गेल्या १५ दिवसांपासून ६ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.
नगर परिषदेने तातडीने गिरिजा मध्यम प्रकल्पात तीन बुडकी विहिरी (चर) खोदण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला.
या तिन्ही विहिरींना मुबलक पाणी लागल्याने जुन्या चार व नवीन बुडकी तीन विहिरींचे पाणी एकत्र करून खुलताबादकरांची तहान भागविली जाणार आहे. मार्च - एप्रिलमध्ये परत एकदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करावी लागणार आहे.
खुलताबाद शहरात काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी असलेले हातपंप नादुरूस्त असून सदरील हातपंप दुरूस्त केल्यास पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु नगर परिषद हातपंप दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे.
नगर परिषदेने तीन नवीन बुडकी विहिरी खोदल्या असून हे काम सुरूच असून त्यास मुबलक लागले आहे. तर एका जुन्या विहिरीचे दुरूस्तीचे कामही हाती घेतल्याने या सर्व दुरूस्तीस किमान पंधरा दिवस लागणार आहेत.