मनपाच्या राजकारणात शिरले ‘पश्चिमी’ वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:42 AM2017-11-10T00:42:57+5:302017-11-10T00:43:00+5:30
शिवसेनेने महापालिकेतील दोन महत्त्वाच्या पदांवर एकाच मतदारसंघातील नगरसेवकांना विराजमान केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेने महापालिकेतील दोन महत्त्वाच्या पदांवर एकाच मतदारसंघातील नगरसेवकांना विराजमान केले आहे. तर सभापती हे पददेखील त्या मतदारसंघातीलच असल्यामुळे मनपाच्या राजकारणात पश्चिमी वारे वाहू लागले आहे. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेत खदखद निर्माण होऊ पाहत आहे.
महापौरपदावर नंदकुमार घोडेले यांना संधी देण्यात आली, ते पश्चिम मतदारसंघातील ईटखेडा वॉर्डाचे नगरसेवक आहेत. सभागृह नेतेपदी विकास जैन यांना संधी मिळाली ते वेदांतनगरचे प्रतिनिधित्व करतात. तर सभापती गजानन बारवाल हे भाजप पुरस्कृत असले तरी ते बन्सीलालनगर भागात राहतात. माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी सभापती दिलीप थोरात, माजी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर स्मिता घोगरे हे सगळे पश्चिम मतदारसंघातीलच होते. माजी महापौर भगवान घडामोडे हे फक्त अपवाद राहिले.
मनपातील ही सर्व पदे एकाच मतदारसंघात गेल्यामुळे राजकीय अस्थैर्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. फुलंब्री, मध्य आणि पूर्व मतदारसंघ शिवसेनेला नको आहेत काय, असाच संदेश यातून जातो आहे. पश्चिम मतदारसंघात भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याला शह देण्यासाठी सेनेने पश्चिम मतदारसंघ ताब्यात राहण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री रामदास कदम यांच्या गटाला दणका देण्यासाठीदेखील खा.चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ.संजय शिरसाट यांनी मोट बांधल्याचे दिसते. महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्र्यांच्या मागे-पुढे फिरणारा गट पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आला होता.
शिवसेनेच्या गटनेत्याला मनपात केबिन नाही. त्यामुळे पूर्व मतदारसंघातील गटनेते मकरंद कुलकर्णी यांना केबिन देण्याचे आदेश पक्षनेत्यांनी दिले आहेत. भाजपच्या गटनेत्याला केबिन आहे, मग शिवसेनेच्या गटनेत्याला का नाही. यावर दोन दिवसांपूर्वी सुभेदारीत चर्चा झाली होती.