मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट गडद; २८४ मंडळांत अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:51 PM2024-09-03T19:51:36+5:302024-09-03T19:53:26+5:30
एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; परभणीतील पाथरी मंडळात ३१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे
छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील २८४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. रेकॉर्डब्रेक पावसाने विभागातील ५ हजार ६८० गावांना चिंब केले. ८७.१ मि.मी. पाऊस एकाच दिवसात बरसला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०० टक्के पावसाची सरासरी पूर्ण झाल्यामुळे मराठवाड्यावर आता ओल्या दुष्काळाचे संकट गडद होत चालले आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहेत. ६८० मि.मी. पाऊस आजवर झाला आहे.
चार जिल्ह्यांची पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पावसाने उघडीप दिली नाहीतर खरीप हंगामाची हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते.
एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस
मराठवाड्यात २ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ८७.१ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा मुसळधार पावसाने मराठवाड्यात पाणीच पाणी केले. जून महिन्याच्या सुरुवातीला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत असाच पाऊस झाला होता.
परभणीतील पाथरी मंडळात ३१४ मि.मी.
परभणीतील पाथरी मंडळात ३१४ मि.मी. म्हणजेच ढगफुटीसारखा पावसाची नोंद झाली आहे. १०० ते २०० मि.मी.च्या दरम्यान १७० मंडळांत पाऊस झाला. १४ मंडळांत २०० मि.मी.च्या पुढे पाऊस झाला. १०० मंडळांत ७० ते १०० मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाली.
५६८० गावे पावसाने चिंब
५ हजार ६८० गावे पावसाने चिंब झाली आहेत. २८४ मंडळांत या गावांचा समावेश असून यातील ६३ गावेे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. ७४ शेतकऱ्यांची ४५ हेक्टर जमीन वाहून गेली.
कोणत्या जिल्ह्यातील किती मंडळांत जोरधार
छत्रपती संभाजीनगर : ४७ मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : १०७ टक्के
जालना : २८ मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : ११५ टक्के
बीड : ५९ मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : ११५ टक्के
लातूर : ३१ मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : ९५ टक्के
धाराशिव : १० मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : १०० टक्के
नांदेड : ४२ मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : ९१ टक्के
परभणी : ५० मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : ९४ टक्के
हिंगोली : १५ मंडळ अतिवृष्टी
पावसाची सरासरी : ९३ टक्के
पावसामुळे झालेले नुकसान
किती गावे बाधित : ६३
मृत्यू किती? : ४
किती जनावरे दगावली : ८८
किती मालमत्तांची पडझड : १३५
पक्क्या घरांचे नुकसान : २९
किती गोठ्यांचे नुकसान : २