वरिष्ठांना समजल्याने ओल्या पार्टीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:57+5:302021-05-21T04:04:57+5:30

उपस्थितांच्या घशाला पडली कोरड खमंग चर्चा रंगली : सहायक पोलीस निरीक्षकांच्या वाढदिवस पार्टीचा फज्जा वाळूज महानगर : वाढदिवसाला पार्ट्या ...

In a wet party with seniors understanding | वरिष्ठांना समजल्याने ओल्या पार्टीत

वरिष्ठांना समजल्याने ओल्या पार्टीत

googlenewsNext

उपस्थितांच्या घशाला पडली कोरड

खमंग चर्चा रंगली : सहायक पोलीस निरीक्षकांच्या वाढदिवस पार्टीचा फज्जा

वाळूज महानगर : वाढदिवसाला पार्ट्या करण्याचे फॅड जोमात आहे. त्यात उच्चपदस्थांच्या पार्ट्यांविषयी बोलणेच नको. अशाच एका पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवसाची ओली पार्टी रंगात येण्यापूर्वीच उधळली गेली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या ओल्या पार्टीचा सुगावा लागल्याचे कळताच, पार्टीचा आनंद लुटणाऱ्यांच्या घशालाच कोरड पडल्याची खमंग चर्चा वाळूज औद्योगिक परिसरात रंगली आहे.

सूत्रांनी सांगितले की, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या व्हर्च्युअल शुभेच्छांचा दिवसभर त्यांच्यावर वर्षाव सुरू होता. त्यात पोलीस निरीक्षक मधुकर सावंत सुट्टीवर असल्याची संधी साधून कर्मचाऱ्यांनी रात्री खास पार्टीचा बेत आखला. निरीक्षक सावंत यांचे रायटर पोना. शेख नवाब यांचे अब्दीमंडीतील फार्म हाउस पार्टी स्थळ ठरले. या पार्टीसाठी साहेबांच्या कुटुंबासह व मित्रमंडळींना निमंत्रणे गेली. त्यांच्या सरबराईची जबाबदारी डीबीचे कर्मचारी व एसपीओवर सोपविण्यात आली. मग, सुंदर आयोजनासाठी डीबीचे कर्मचारी व एसपीओ लवकरच काम आटोपून अब्दीमंडीकडे रवाना झाले व पार्टीच्या तयारीला लागले. ओल्या पार्टीला मांसाहार व शाकाहाराचा तडका होता.

अन् वरिष्ठांचा खोडा

ठरल्याप्रमाणे बर्थडे बॉयसह कुुटुंबीय व मित्रमंडळ रात्री उशिरा फार्म हाउसवर पोहोचले. पण, पार्टी खुपणाऱ्या एका उपस्थिताने ही माहिती वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी खात्री करण्यासाठी दौलताबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बातमी फुटली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पार्टीची कुणकुण लागल्याचे समजताच सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले. कारवाईच्या भीतीने तेथून मग एकेकाने काढता पाय घेत पलायन केले. पार्टी उधळली गेल्याची चर्चा वाळूज उद्योगनगरी व शहरात दिवसभर दबक्या आवाजात सुरू होती. सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा काही प्रकार झालाच नसल्याचा दावा केला.

---------------------------------

Web Title: In a wet party with seniors understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.