भीजपावसाने पिकांना जीवदान, मात्र जलसाठे रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:23 PM2021-08-23T12:23:38+5:302021-08-23T12:27:47+5:30

Rain Shortage in Aurangabad : मागील ८ दिवसात पडलेल्या भिजपावसाने करमाड पंचक्रोशीतील खरीप पिकांना पुन्हा जीवदान मिळाले आहे.

Wet rains save crops, but water reservoirs are empty in Aurangabad | भीजपावसाने पिकांना जीवदान, मात्र जलसाठे रिकामेच

भीजपावसाने पिकांना जीवदान, मात्र जलसाठे रिकामेच

googlenewsNext
ठळक मुद्देआगामी दीड महिन्यातही पावसाची स्थिती अशीच राहिली तर गंभीर स्थिती उन्हाळ्यात हे तलाव कोरडेठाक पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते

करमाड ( औरंगाबाद ) : पावसाळ्याचा अर्धाअधिक कालावधी होत आला तरी औरंगाबाद तालुक्यातील बहुतांश भागात आजपर्यंत मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तब्बल महिन्याभराच्या विश्रांतीनंतर जवळपास आठवडाभर झालेल्या भिजपावसानेे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील जलसाठे कोरडे असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सुखनासह इतर धरणांची जलसाठ्यात अपेक्षित जलसाठा नसल्याने तालुक्यातील फळबागा उत्पादकांसह सर्वच शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. ( Wet rains save crops, but water reservoirs are empty in Aurangabad ) 

मागील वर्षी जिल्ह्यासह​ तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश तलावात आजस्थितीत बर्यापैकी पाणी आहे. यावर पुढील काही महिने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकेल. तथापि, आगामी दीड महिन्यातही पावसाची स्थिती अशीच राहिली तर मात्र ऐन उन्हाळ्यात हे तलाव कोरडेठाक पडून तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, अशी भिती जाणकरांनी व्यक्त केली आहे. यावर्षी पावसाच्या सुरूवाती पासुनच तालुक्यातील कुंभेफळ, लाडगाव, शेंद्रा बन, शेंद्रा कमंगर, वडखा, वरझडी, नाथनगर आदी भागात जेमतेम पाऊस पडला. येथील शेतकर्यांनी यावरच पेरण्या आटोपल्या. याच जेमतेम पावसावर पिकेही जोमदार आली. दरम्यान, मागील एक महिन्याच्या पावसाच्या दडीमुळे आता पिकांवर नांगर फिरवायची वेळ येऊन ठेपली होती. यातच जवळपास आठ दिवस या भागात ठिबक प्रमाणे अधुन-मधुन पाऊस होत असल्याने सध्यातरी या पिकांना जीवदान मिळाल्याचे म्हणता येईल.

याच्या उलट, तालुक्याचा केंद्रबिंदु म्हणून ओळखल्या जाणार्या करमाडसह त्याच्या उत्तरेकडील भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर गेवराई, दुधड, पिंपळखुंटा, लाडसावंगी व या गाव परिसरात पावसाळ्याच्या सुरूवातीला व अधुन-मधुन समाधानकारक पाऊस पडला आहे. यातच दुधड, भांबर्डा व परिसरात तर एक अतिवृष्टीचा पाऊसही होऊन गेला. पण येथेही मागील महिन्याभरांपासुन पावसाची विश्रांती होती. परंतु आजही येथील पिके जोमदार, सुस्थितीत व पाहिजे त्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. सोबतच अतिवृष्टीनेे येथील नदी-नाल्यांना गेलेल्या पुरासह छोट-छोटया पाझर तलावातही पाणीसाठा शिल्लक आहे. या शिवाय तालुक्यातील मंगरूळ, जडगाव, पिंप्रीराजा, टाकळीमाळी, सांजखेडा, पांढरी पिंपळगाव, कचनेर, कोरघळ, दरकवाडी, आडगाव ठोंबरे, गोलटगाव, कौडगाव, शेकटा, वाहेगाव, देमणी, चित्तेपिंपळगाव, निपाणी, गारखेडा, लायगाव, खोडेगाव आदी गावातही पावसाचा विश्रांतीचा काळ सोडल्यास समाधानकारक नसला तरी बर्यापैकी पाऊस पडलेला आहे. तथापि, आता जोरदार पावसाची अत्यंत आवश्यकता असुन तो न पडल्यास पिकांच्या उत्पादनात कमालीची घट नोंदविली जाऊ शकते सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील धरणे व एकूण जलसाठा 
औरंगाबाद तालुक्यात बनगाव येथे लहुकी, लाडसावंगी येथील बाबूवाडी, दौलताबाद येथील मोमबत्ता तलाव व गारखेडा येथील सुखना या धरणांचा समावेश आहे. यात सुखना धरण सर्वात मोठे आहे. मागील वर्षी सगळीकडेच चांगले पर्जन्यमान राहिल्याने कोरड्याठाक पडलेल्या सर्वच धरणात अवघ्या दोनच महिन्यात 100% पाणीसाठा झाला होता. यातील सुखना धरण तर तब्बल 14 वर्षांनंतर भरले होते. आजही या धरणांसह इतर धरणांत व पाझर तलावांत पन्नास टक्क्यांच्यावर पाणीसाठा शिल्लक आहे. परतीच्या पावसाच्या काळात जर मोठे पाऊस झाले नाही तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो हे निश्चित.

Web Title: Wet rains save crops, but water reservoirs are empty in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.