काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन?
By संतोष हिरेमठ | Updated: December 4, 2024 12:38 IST2024-12-04T12:37:22+5:302024-12-04T12:38:24+5:30
रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा : रेल्वे येण्याच्या वेळेत ८० रिक्षांचा प्रवेशद्वाराला विळखा, शहरात येणाऱ्या पाहुण्यांना प्रचंड त्रास

काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन?
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे खरेच रेल्वेस्थानक आहे की, रिक्षांचे स्टेशन आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. कारण या ठिकाणी रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरात येणाऱ्या पाहुण्यांना म्हणजेच रेल्वे प्रवाशांना आणि परदेशी पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराकडे ना रेल्वे प्रशासनाचे लक्ष आहे, ना पोलिसांचे. त्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त कोण लावणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
रेल्वे येण्याच्या वेळेत ८० रिक्षा आणि चालकांचा स्टेशनच्या प्रवेशद्वाराला विळखा पडतो. रेल्वेतून उतरून प्रवासी स्टेशनबाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वारापर्यंत येत नाही तोच थेट आतमध्ये आलेले रिक्षाचालक ‘कुठे जायचे, बाबा आहे का, वाळूज आहे का?’ असे म्हणत मागे लागतात. प्रवाशाने नाही म्हटले तरी एकेका रिक्षाचालकांकडून विचारणा सुरूच राहते. स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अस्ताव्यस्त अवस्थेत उभ्या केलेल्या रिक्षा दिसतात. अनेक रिक्षाचालक घेरून प्रवाशांच्या मागे लागतात. या सगळ्यांचा दुचाकी, चारचाकी घेऊन प्रवाशांना नेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बॅरिकेड्स लावून दुचाकी अडवितात, रिक्षाला अभय
रेल्वे स्टेशनवर प्रवेश करताच समोर बॅरिकेड्स लावलेले पाहायला मिळतात. दुचाकी वाहने पार्किंगमध्ये लावण्याची जणू सक्तीच करण्यात आलेली आहे. दुचाकीवरून प्रवाशास स्टेशन इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडता येत नाही. त्याउलट रिक्षाचालक थेट आतपर्यंत घुसखोरी करीत आहेत.
पोलिस चौकी नावालाच
स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर पोलिस चौकी आहे. मात्र, या ठिकाणी पोलिस कर्मचारी नसतात. आजघडीला ही चौकी अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. या ठिकाणी भिक्षेकरी बसतात.
रेल्वे सुरक्षा बल काय करते?
स्टेशन परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) असते; परंतु एखाद्या मोहिमेपुरतेच रेल्वे सुरक्षा बल रिक्षाचालकांवर कारवाई करते. त्यामुळे रिक्षाचालकांना कुणाचीही भीती उरलेली नाही.
प्रवेशद्वारावर कोंडी
रेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वारांसमोर रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यातून प्रवाशांना स्टेशनमध्ये येताना आणि बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागते.
...तर गुन्हे दाखल करा
कोणताही रिक्षाचालक चुकीचे वागत असेल तर कारवाई करावी. पूर्णवेळ व्यवसाय म्हणून रिक्षा चालविणारे नियमांचे पालन करतात. मात्र, पार्टटाइम रिक्षा चालविणारे बेशिस्त वागतात. लायसेन्स, बॅज, क्यूआर काेडची तपासणी केली पाहिजे. लायसेन्स, बॅज नसताना रिक्षा चालवीत असल्याचे कुणी आढळले तर थेट रिक्षामालकांवर गुन्हे दाखल करावेत.
- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षा चालक-मालक महासंघ