ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

By सुमित डोळे | Published: June 26, 2024 03:11 PM2024-06-26T15:11:39+5:302024-06-26T15:12:11+5:30

मनपाला बेशिस्त वाहतुकीचे सोयरसुतक नाही, जी-२० मध्ये ५० कोटींचा खर्च, अधिकाऱ्यांच्या दालनांवर लाखोंची उधळण, वाहतूक व्यवस्थेचे मात्र तीनतेरा,

What a smart city! Out of 40 traffic signals in Chhatrapati Sambhajinagar, 29 signals are 30 years old | ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

ही कसली स्मार्ट सिटी! छत्रपती संभाजीनगरात ४० वाहतूक सिग्नलपैकी २९ सिग्नल ३० वर्षे जुनेच

छत्रपती संभाजीनगर : आठ वर्षांपूर्वी शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. त्यानंतर शहरात अनेक विकासकामे सुरू झाल्याचा दावा मनपाने केला. जी-२० दरम्यान शहराच्या सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, शहराची वाहतूक व्यवस्थेवर खर्चासाठी मनपाच्या स्मार्ट सिटी विभागाला सपशेल विसर पडला. स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरात वाहतुकीची धुरा असलेली सिग्नल तब्बल ३० वर्ष जुनाट व निष्क्रिय झालेली आहे. परिणामी, संपूर्ण शहरात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असताना मनपाला मात्र त्याचे सोयरसुतक नाही, हे विशेष.

जून २०१५ मध्ये लाँच झालेल्या स्मार्ट सिटी मिशनद्वारे नागरिकांना मुख्य पायाभूत सुविधा, स्वच्छ वातावरण, स्मार्ट जीवनाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रतिवर्ष सुमारे १०० कोटींचा निधी यातून शहरांना देण्याचे नियोजित होते. शहरात स्मार्ट सिटी योजनेतून ७०० कोटींपेक्षा अधिक मोठ्या प्रकल्पांचे नियोजन करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांनी दाखवले. मात्र, यात शहराची प्रतिमा अवलंबून असलेल्या वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. पोलिसांच्या मते, वाहनांची संख्या लोकसंख्येच्या ६० टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. एकीकडे शहरात वाहनांची संख्या भरमसाठ वाढत असताना तुलनेत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी प्रभावी व्यवस्थाच उभी केली गेली नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली.

यासाठी इच्छाशक्तीच नाही
राज्यातील अन्य स्मार्ट सिटी असलेल्या वाहतूक समिती कार्यरत आहे. त्यात मनपा आयुक्त, अभियंत्यांसह, वाहतूक अभियंत्यांचा समावेश असतो. ठराविक कालावधीनंतर या समितीची बैठक होऊन शहराच्या वाहतूक समस्यांवर चर्चा व उपाययोजना ठरवले जाते. शहरात मात्र मनपाकडे वाहतूक अभियंता असे पदच नाही. शिवाय, गेल्या तीन वर्षांपासून मनपा प्रशासक वा अन्य अधिकाऱ्यांनी वाहतुकीच्या समस्यांसाठी एकही बैठक बोलावली नाही.

अशी आहे सिग्नलची अवस्था :
येथे ३० वर्षे जुने सिग्नल

-बाबा पेट्रोल पंप, पंचवटी, नगरनाका, हॉटेल अमरप्रीत, मोंढा नाका, आकाशवाणी, जिल्हाधिकारी कार्यालय, सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, जुने हायकोर्ट, हॉटेल कार्तिकी, मिल कॉर्नर, रेल्वेस्टेशन चौक, सिल्लेखाना, समर्थनगर, जुब्ली पार्क, बलवंत चौक, क्रांतीचौक, महानुभव आश्रम, नवीन हायकोर्ट चौक, एस.बी.ओ.ए. चौक, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी, एन-१ चौक, टी. व्ही. सेंटर चौक, शरद टी पॉईंट, बजरंग चौक, आंबेडकर चौक.

२०१५ मध्ये नवे ९ सिग्नल
१९९४-९५ नंतर शहरात २०१५ मध्ये ९ नवे सिग्नल बसवण्यात आले. यात चंपा चौक, रोपळेकर रुग्णालय, शहानूर मिया दर्गा चौक, बी. एस. एन. एल. चौक, जवाहरनगर पोलिस ठाणे चौक, सेव्हनहिल उड्डाणपूल, सिटी क्लब, कोकणवाडी, चिश्तिचा चौकाचा समावेश करण्यात आला.

केवळ २ स्मार्ट सिग्नल
शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबलेली असताना स्मार्ट सिटीकडून केवळ ओखार्ड चौक व मिलिंद चौकात अद्ययावत प्रणालीचे सिग्नल बसवण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. अन्यत्र दुरुस्ती देखील नीट केली गेली नाही.

साधे टाईमरही नाही
-४० सिग्नलपैकी २१ सिग्नलमध्ये टाइमर बंद आहे.
-८ सिग्नलमध्ये टाइमर प्रणालीच नाही.
-३८ सिग्नलमध्ये साधा फ्रि लेफ्ट टर्न लॅम्प नाही.

वाहनांची संख्या अचंबित करणारी
-२०१९ मध्ये १३ लाख ६८ हजार वाहने. -२०२३-२४ मध्ये ८२ हजार ७२७ वाहनांची भर.
-मे, २०२४ पर्यंत १६ लाख ७० हजार वाहनांची नोंद.
-महिन्याला सरासरी सात हजार वाहनांची भर.

Web Title: What a smart city! Out of 40 traffic signals in Chhatrapati Sambhajinagar, 29 signals are 30 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.