छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव रेल्वे मार्गाचे काय? मराठवाड्याच्या वाट्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षाच
By संतोष हिरेमठ | Published: August 12, 2024 12:16 PM2024-08-12T12:16:49+5:302024-08-12T12:31:11+5:30
दिल्ली आणि उत्तर भारतातील रेल्वे प्रवासाचे अंतर कमी होण्याकडे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जालना - जळगाव रेल्वे मार्गाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद - कन्नड - चाळीसगाव हा रेल्वे मार्ग कधी होणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या रेल्वेंना आजघडीला मनमाडहून जावे लागत आहे. या रेल्वे मनमाडहून चाळीसगाव आणि जळगावमार्गे उत्तर भारताकडे जातात. छत्रपती संभाजीनगरहून चाळीसगाव रेल्वेने जाण्यासाठी आजघडीला हा १६० किमीचा प्रवास करण्यासाठी ३ तासांपेक्षा अधिक वेळ जातो. छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव असा ९४ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केल्यास, मनमाड न जाता थेट रेल्वे गाड्या चाळीसगावला पोहोचतील. प्रवाशांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टळेल, असा प्रस्ताव होता. मात्र, कामाचा खर्च आणि मिळणारा परतावा, हे कारण पुढे करून हा मार्ग कागदावरच ठेवला जात असल्याची ओरड होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमार्गे होता मार्ग
गेली अनेक वर्षे छत्रपती संभाजीनगरमार्गे सोलापूर - जळगाव या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात येत होती. हा मार्ग सोलापूर - तुळजापूर - पैठण - छत्रपती संभाजीनगर - जळगाव असा होता. मात्र, हा मार्ग रेल्वे बोर्डाने कधी पुढे सरकविलाच नाही, अशी ओरड होत आहे.
लवकर मार्गी लागावा
छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वे मार्गाने दिल्लीचे अंतर कमी होईल. जालना - जळगाव रेल्वे मार्गाचा ‘रूट’ वेगळा आहे आणि या मार्गाचा ‘रूट’ वेगळा आहे. हा मार्ग लवकर मार्गी लावला पाहिजे.
- डाॅ. अण्णासाहेब शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव नियोजित रेल्वे मार्ग संघर्ष समिती
रेल्वे मार्ग व्हावा
सोलापूर - तुळजापूर- धाराशिव - कुंथलगिरी - बीड - गेवराई राक्षस भुवन - पैठण - छत्रपती संभाजीनगर - कन्नड - चाळीसगाव असा लोहमार्ग झाल्यास दक्षिण भारत ते उत्तर भारत जोडण्यास मोठी मदत होईल. यामुळे मराठवाड्याची खूप मोठी सोय होईल. छत्रपती संभाजीनगर - चाळीसगाव रेल्वे मार्ग झाल्यास मनमाड स्टेशनवरील लोड कमी होईल. या मार्गाला लागूनच नॅशनल हायवे क्रमांक ५२ जात असल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक कमी होईल.
- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
छत्रपती संभाजीनगरला ब्रांच लाइनने जोडावे
आगामी काळात छत्रपती संभाजीनगरला तब्बल साठ हजार कोटींचे मोठे प्रकल्प येत आहेत. असे असताना शहराच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र सरकारने प्राधान्य देणे अपेक्षित होते. सुमारे २० लाख लोकसंख्या आणि औद्योगिक पट्टा जालना -जळगाव बायपास करेल. त्यामुळे या प्रकल्पाचा मराठवाड्याला खरंच किती फायदा होईल याबद्दल शंका आहे. या मंजूर मार्गाला जर सिल्लोड - फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर अशी ब्रांच लाइन जोडली तर हा मार्ग फायद्यात येईलच, पण उद्योग आणि व्यापारासाठीही मोठी सोय होईल.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक