पतसंस्थेतील पुंजीचे काय? २०० कोटींच्या ‘आदर्श’ घोटाळ्याने खातेदारांचा जीव टांगणीला!
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 13, 2023 06:23 PM2023-07-13T18:23:31+5:302023-07-13T18:24:30+5:30
नियमबाह्य कर्जाची खैरात वाटप करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे पितळ उघडे पडले.
छत्रपती संभाजीनगर : तब्बल १३ टक्के दराने व्याजदर देतो, असे सांगितल्याने आम्ही आमची आयुष्याची पुंजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवली. पण, हीच बँक आमच्या पैशाचे संरक्षण करण्यापेक्षा ‘भक्षक’ बनेल, हे आमच्या मनातही कधी आले नाही. माझ्या निवृत्तीची सर्व रक्कम या बँकेत ठेवली, आता उर्वरित आयुष्य ‘भीक’ मागून जगण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असा संताप ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत होते.
नियमबाह्य कर्जाची खैरात वाटप करणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचे पितळ उघडे पडले. अध्यक्ष अंबादास मानकापे व इतर संचालकांविरोधात मंगळवारी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल झाले. बुधवारी वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध होताच खातेदारांनी बँकेसमोर गर्दी केली होती. आमचे पैसे आम्हाला परत द्या, अशी मागणी व्यक्त करत होते. दुपारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार आले व पतसंस्थेत व्यवस्थापकांकडे त्यानी चौकशी केली. त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना खातेदारांनी गराडा घातला होता. आता आमची रक्कम मिळेल का, असा प्रश्न त्यांनी पवार यांना केला. तुम्ही तुमच्या तक्रारी पोलिस स्टेशनला दाखल करा, आम्ही फरार संचालकांचा शोध घेत आहोत. त्यांची संपत्ती जप्त करून तुमची रक्कम परत केली जाईल, असा धीर त्यांनी खातेदारांना दिला. पोलिस निघून गेल्यानंतरही सायंकाळपर्यंत खातेदार पतसंस्थेबाहेर उभेच होते. मात्र, पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालकांपैकी तिकडे कोणी फिरकले नाही.
आमची फसवणूक
जास्तीचे व्याज देत असल्याने आम्ही पतसंस्थेत खाते उघडले. आयुष्याची रक्कम भरली. संचालक मंडळाने आमचा विश्वासघात केला. काही करा, आमची रक्कम परत करा. आता उतारवयात काय करणार?
- श्रीनिवास तोतला, ज्येष्ठ नागरिक
१६ लाख अडकले
दुप्पट व्याजदर देत असल्याने माझे, माझ्या आईचे व इतर नातेवाइकांचे १६ लाख रुपये पतसंस्थेत ठेवले होते.
- अफरीन मजीद सय्यद,खातेदार
ठेवीदार लागले पाठीमागे
मी या पतसंस्थेत कलेक्शन एजंट म्हणून काम करीत होतो. मी स्वत: ३ लाख रुपये खात्यात ठेवले. तर, सव्वा लाख रुपये अन्य ठेवीदारांचे ठेवले होते. आता हे ठेवीदार माझ्या पाठीमागे लागले आहेत.
- कृष्णा गोडसे, कलेक्शन एजंट