काय बोलता, आता ‘वीट’ झाली मऊ अन् गोड !
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 2, 2023 12:27 PM2023-12-02T12:27:28+5:302023-12-02T12:27:47+5:30
जसा विटांच्या आकारातील गूळ आला आहे तसे ‘मोदक’, ‘दिल’ (बदाम) आकारातील गूळही बाजारात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘विटा’ गोड झाल्या आहेत, असे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल ऐकावे ते नवल...! एरव्ही ‘लाल माती’च्या किंवा ‘ॲश’ने बनविलेल्या ‘विटा’ एकदम कशा काय गोड झाल्या, असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाला असेल. हा काही चमत्कार नव्हे...तर या गोड विटा बांधकामासाठी नव्हे तर खाण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. आता हे वाचल्यावर तुमची जाणून घेण्याची उत्सुकता आणखी वाढली असेल. अहो, थांबा जरा; कारण, या विटा ‘गुळा’पासून तयार केलेल्या आहेत !
६० रुपयांना एक वीट
गूळ म्हटले की, आपणास पारंपरिक पद्धतीने बनविलेली ढेप आठवते. मात्र, आता काळानुरूप गुळाने आपला आकार बदलला आहे. अधिक आकर्षक आकारांत गूळ बाजारात विक्रीला आला आहे. त्यांतीलच एक आकार म्हणजे ‘वीटकरी’सारखा आकार होय. दुरून पाहिले तर हा गूळ म्हणजे वीटच वाटते; पण हातात घेतल्यावर कळते, हा विटेच्या आकारातील गूळ आहे. गुऱ्हाळ करणाऱ्यांची नवीन पिढी आता गुळाच्या आकारात नवनवीन बदल घडवून आणत आहे. सध्या एक आख्खी वीट ५५ ते ६० रुपये किलोने विकली जात आहे.
मोदक, दिलच्या आकारात गूळ
जसा विटांच्या आकारातील गूळ आला आहे तसे ‘मोदक’, ‘दिल’ (बदाम) आकारातील गूळही बाजारात आला आहे. आता दीड महिन्यावर संक्रांत येऊन ठेपली आहे; यामुळे पाव किलोपासून छोट्या आकारातील ढेपा येऊ लागल्या आहेत. मोदक ८० ते ८५ रुपये; तर बदाम ११० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.
गुळ ८०० रुपयांनी महाग
मागील वर्षी होलसेलमध्ये गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३००० रुपये विकत होते. सध्या ३४०० ते ३८०० रुपये क्विंटलने गूळ विकला जात आहे. एक क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपयांनी गूळ महागला आहे. लातूर येथील गावरान गूळ ४१०० ते ४५०० रुपये क्विंटल विकला जात आहे. हा गूळ शीतगृहातील आहे. नवीन गुऱ्हाळ सुरू झाले असून येत्या १५ दिवसांत नवीन गूळ बाजारात दाखल होईल.
गुळात आणखी भाववाढीची शक्यता
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुळाचे भाव वाढले आहे. कडबा ४ ते ५ हजार रुपये विकत आहे; तर ऊस ३ ते ३२०० रुपये टन विकत आहे. यामुळे जनावरांना खाऊ घालण्यासाठी उसाचा वापर होत आहे. साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात ऊस जात आहे. यामुळे गुऱ्हाळाकडे ऊस कमी येत आहे. त्यात चोहोबाजूंनी मागणी वाढल्याने येत्या काळात गुळात भाववाढ होईल.
- सुमतीलाल ब्रह्मेचा, व्यापारी