काय बोलता! शाळू ज्वारी सहा हजारी; बाजरीची भाकरीसाठीही थंडीत खिसा गरम करावा लागणार
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 1, 2023 06:22 PM2023-12-01T18:22:45+5:302023-12-01T18:25:01+5:30
ज्वारी व बाजरीची भाकरी खाणे आता आरोग्याच्या श्रीमंतीचे लक्षण ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर : शाळू ज्वारीचे भाव ६ हजार रुपये क्विंटल असे सांगितले तर तुम्ही एकदम भुवया उंच करता ‘काय बोलता... ’. असे म्हणाल पण, हे खरं आहे शाळू ज्वारी पहिल्यांदाच सहा हजारी बनली आहे. एवढेच नव्हे तर हिवाळा सुरू झाला असून बाजरीची भाकरी खाण्याअगोदर खरेदीसाठी खिसा गरम करावा लागणार आहे.
मध्यंतरीचा काळा असा होता की, ज्वारी व बाजरी हे मध्यमवर्गीय, गरीबांचा आहार समजल्या जात होते. पण आता याची पौष्टिकता लक्षात आल्यावर व कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नवनवीन वाणाची निर्मिती केल्याने शाळू ज्वारी असो वा बाजरी खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एवढेच नव्हे तर मधुमेही रुग्णांना गव्हाच्या पोळीपेक्षा अलटून पालटून कधी ज्वारीची भाकरी तर कधी बाजरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. ज्वारी व बाजरीची भाकरी खाणे आता आरोग्याच्या श्रीमंतीचे लक्षण ठरत आहे.
शाळू ज्वारीचे का वाढले भाव
एरवी शाळू ज्वारी ३५०० ते ४००० रुपये क्विंटल विकली जाते. मात्र, एप्रिल-मे महिन्यात ज्वारीचे उत्पादन कमी झाले. त्याचा आता परिणाम जाणवत आहे. शाळू ज्वारी ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल आता विकत आहे. या भावातही चांगल्या दर्जाची ज्वारी मिळत नाही, हे विशेष. नवीन शाळू ज्वारी आता पुढील वर्षी मार्चमध्ये होळी सणानंतर येईल. तोपर्यंत भाव चढेच राहतील.
थंडी अन् बाजरीची गरम भाकरी
थंडीच्या दिवसात गरमागरम बाजरीची भाकरी खाण्याची मज्जा काही और असते. पाऊस कमी पडल्याने यंदा बाजरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. यामुळे बाजारीचे भाव क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत. मागील वर्षी २५०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल मिळणारी बाजरी सध्या ३००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल खरेदी करावी लागत आहे.
हलका गहू ३२०० रुपयाला
नुसते बाजारी व ज्वारीचे भाव वाढले नाही तर गव्हाचे भावही वाढले आहे. गव्हाचे भाव ३२०० रुपये ते ४००० रुपये प्रति क्विंटल आहेत. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात झालेली निर्यात तसेच शासनाच्या गोदामात गव्हाचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने शिवाय पावसा अभावी सध्या पेराही कमी असल्याने भविष्यात किती भाववाढ होईल हे सध्या सांगता येत नाही.
-जगदीश भंडारी, व्यापारी