आईच्या काय आले मनात; पोटच्या चिमुकल्यांचा नाक, तोंड दाबून घोटला गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:17 PM2023-02-07T12:17:43+5:302023-02-07T12:17:56+5:30
निर्दयीपणे नाक-तोंड दाबून आईनेच दोन चिमुकल्यांना संपवले; औरंगाबादच्या सादातनगरातील येथील खळबळजनक घटना
औरंगाबाद : सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांच्या मुलाचे नाक-तोंड दाबून आईनेच खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सातारा पोलिसांनी दोन्ही चिमुकल्याच्या कुटुंबालाच चौकशीसाठी ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. मृतांमध्ये मुलगी अदिबा फहाद बसरावी (६) व अली फहाद बसरावी (४, दोघे रा. सादातनगर) यांचा समावेश आहे.
सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिबा व अली हे दोघे रविवारी रात्री जेवण केल्यानंतर खोलीमध्ये झोपी गेले. सकाळी १२ वाजेपर्यंत ते खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यामुळे त्यांची आई त्यांना उठविण्यासाठी गेली. तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. याची माहिती कुटुंबातील इतरांना दिल्यानंतर दोघांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी दुपारी १:३० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या दोघांच्या गळ्यावर किंवा तोंडावर कोणत्याही प्रकारचे व्रण नव्हते. त्यामुळे दोन्ही मुलांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याविषयी चर्चा करण्यात येत होती.
घाटी रुग्णालयात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवालात दोघांचा मृत्यू नाक-तोंड दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक फाैजदार चंद्रभान गवांदे, तपासी अंमलदार एम. आर. अकोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना अनेक संशयास्पद बाबी आढळल्या. त्यामुळे मुलांच्या खुनाच्या प्रकरणात सर्वच कुटुंबाची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान आईनेच पोटच्या दोन्ही मुलांना संपवल्याचे पुढे आले. सालेबीन हुसेन बसरावी ( 31) यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिसांनी आलीया फहाद बसरावी ( 22 ) विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
नातेवाइकांचा बोलण्यास नकार
घाटी रुग्णालयात मुलांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. मुलांच्या मृत्यूविषयी एकही नातेवाईक बोलण्यास तयार नव्हते. मृत मुलाच्या वडिलाचे बाबा पेट्रोल पंप परिसरातील म्हाडा कॉलनीत किराणा दुकान आहे. या दुकानासाठी फहाद यांना त्यांचा भाऊ मदत करीत होता.
आईच्या डोक्यावर परिणाम
दरम्यान, सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलांच्या आईच्या डोक्यावर चार महिन्यांपूर्वी परिणाम झालेला आहे. सोमवारी सकाळपासून ती मुलांच्या खोलीतून बाहेर आलीच नाही. जेव्हा बाहेर पडली तेव्हा घटना उघडकीस आल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना दिली.