"काय सांगावे, मुलींना सांभाळणे कठीण झाले"; बालविवाह मागे मुलीच्या बापाने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:35 PM2024-08-31T12:35:18+5:302024-08-31T12:35:55+5:30
एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलाचे स्थळ चालून आल्याने तीन मुलींच्या बापाने सर्वांत लहान मुलीचे सतराव्या वर्षीच लग्नाचा घाट घातला.
छत्रपती संभाजीनगर : नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाने अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा घाट घातला. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचताच दामिनी पथकाने धाव घेत लग्न थांबवून वर, वधूच्या कुटुंबाला नोटीस बजावली. शुक्रवारी कटकट गेट भागात दुपारी १२ वाजता ही कारवाई करण्यात आली.
१७ वर्षीय मुलगी कुटुंबासह कटकट गेट भागात राहते. ती सध्या शालेय शिक्षण घेत आहे. घरी अठराविश्व दारिद्र्य, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून मुलींच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याचे मोठे आव्हान हाेते. त्यातच एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलाचे स्थळ चालून आल्याने तीन मुलींच्या बापाने सर्वांत लहान मुलीचे सतराव्या वर्षीच लग्नाचा घाट घातला. ३० ऑगस्ट रोजी कटकट गेट भागातील एका सभागृहात लग्नाची तारीख निश्चित झाली. सकाळी ११ वाजेपासूनच दोन्ही नातेवाईक दाखल होण्यास सुरुवात झाली होती.
दामिनी पथकप्रमुख कांचन मिरधे यांना ११:३० वाजता अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांनी तत्काळ सहायक फौजदार लता जाधव, कल्पना खरात, सुजाता खरात, अमृता भोपळे, सोनाली निकम, प्रियंका भिवसने, आबासाहेब फोलाने यांच्यासह धाव घेतली.
पोलिसांनी केले समुपदेशन
पोलिस आल्याचे पाहून सभागृहात एकच धांदल उडाली. पोलिसांना पाहून कुटुंबाने चूक मान्य केले. पोलिसांनी कारण विचारल्यावर घरची गरीब परिस्थिती, मुलांचे शिक्षण करणे अशक्य असल्याचे सांगून मुलींना सांभाळणे कठीण झाले आहे, अशी व्यथा वडिलांनी पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी समुपदेशन करून महिला व बालविकास समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले.