अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 08:12 PM2024-09-05T20:12:07+5:302024-09-05T20:12:23+5:30

आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात.

What causes esophageal cancer to grow? What are the symptoms? | अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

छत्रपती संभाजीनगर : अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. अन्ननलिकेचा कर्करोग हा सर्व कर्करोगांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे, तर भारतात मृत्यू होणाऱ्या सर्व कॅन्सरमध्ये याचा चौथा क्रमांक लागतो. पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण महिलांपेक्षा काहीसे अधिक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील रुग्ण या कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण खूप आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लक्षणे काय?
९० टक्के रुग्णांना गिळण्याचा त्रास होतो. सुरुवातीला अन्न गिळण्यास त्रास व्हायला लागतो. नंतर पाणी पिण्यासही अडचण येते. आवाजात बदल होणे, सतत छातीत जळजळ होणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कधी कधी सततचा खोकला लागणे ही काही लक्षणे आहेत. ही लक्षणे असणे म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोग आहेच असे नाही.

कारणे काय?
तंबाखूचे सेवन, मद्याचे सेवन, अति प्रमाणात शिळे अन्न खाणे, जेवणामध्ये व्हिटॅमिन, तंतूमय, प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी असणे, वर्षानुवर्षे जळजळीचा त्रास असणे, ‘बरेट्स इसोफागस’ किंवा ‘एकाजीआ’ हा आजार असणे, स्थूलपणा आदींमुळे अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.

निदान कसे करता येते?
निदान करण्यासाठी अन्ननलिका, पोटाची एंडोस्कोपी व बायोप्सी करणे गरजेचे असते. आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात.

काळजी काय घ्याल?
निर्व्यसनी राहणे, ताजे व्हिटॅमिनयुक्त, तंतूमय, व प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. नियमितपणे व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आदी काळजी घ्यावी. काही लक्षणे असल्यास न घाबरता तज्ज्ञांचा सल्ला घेणे, ते सांगतील त्या तपासण्या करून घेणे महत्त्वाचे ठरते.

वर्षाला २० ते २२ शस्त्रक्रिया
अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या उपचारात बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया, किरणोपचार व किमो-औषधी या तिन्ही उपचारपद्धती लागतात. साधारणपणे वर्षाला २० ते २२ शस्त्रक्रिया शासकीय कर्करोग रुग्णालयात होतात. या शस्त्रक्रिया आता कमी त्रासाच्या लेप्रोस्कोपी किंवा रोबोटिक पद्धतीनेदेखील होऊ शकतात. तिसऱ्या पायरीतील रुग्णदेखील संपूर्ण उपचार केल्यास बरे होऊ शकतात. कधीही हिम्मत आणि बरे होण्याची आशा सोडू नये.
- डाॅ. अजय बोराळकर, शासकीय कर्करोग रुग्णालय

Web Title: What causes esophageal cancer to grow? What are the symptoms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.