फोटोमध्ये भाऊ काय ‘डॅशिंग’ दिसतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:04 AM2021-01-09T04:04:51+5:302021-01-09T04:04:51+5:30
बनकिन्होळा : यावेळी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव पडल्याचे दिसत आहे. तरुण पिढीसह वयोवृद्धही सोशल मीडियावर प्रचाराचे ...
बनकिन्होळा : यावेळी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव पडल्याचे दिसत आहे. तरुण पिढीसह वयोवृद्धही सोशल मीडियावर प्रचाराचे मेसेज, फाेटो टाकून मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. कोणताही खर्च न करता, मोबाइलमध्येच फोटो एडिटिंग करून भाऊ काय ‘डॅशिंग’ दिसतो, शंभर टक्के निवडून येणारच, असे समर्थक म्हणताना दिसत आहे.
सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. यावेळी गावचा विकास करण्यासाठी तरुणाईही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरल्याने जुन्या खोडांची गोची झाली आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या प्रचारासाेबतच तरुण पिढी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत असल्याचे दिसत आहे. सकाळ होताच धडाधड मेसेज मोबाइलवर पडू लागतात. हे सर्व करीत असताना, पारंपरिक पद्धतीने वॉर्ड बैठका, गावबैठका, घरोघरी आणि चौकाचौकांत रणनीती ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. ॲण्डॉइड मोबाइलचा कधीही वापर न करणारे चेहरेही सोशल मीडियावर चमकत असल्याचे दिसत आहे.
बॅनरबाजी कमी
या निवडणुकीत मोठमोठे कटआऊट, बॅनरबाजी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यावर खर्च केल्यापेक्षा सोशल मीडियावर तरुणाई ॲक्टिव्ह आहे. व्हिडिओ, ऑडिओ आणि मिक्सिंग चित्रांचा सोशल मीडियावर वर्षाव सुरू आहे. जसा पाहिजे तसा फोटो एडिटिंग करून फेसबुक, व्हॉटस्ॲप, यू-ट्यूब आदी सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. मोबाइलवर हे सर्व होत असल्याने यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही.