कोरोनाने काय शिकविले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:05 AM2021-03-21T04:05:12+5:302021-03-21T04:05:12+5:30
औरंगाबाद : माणसासाठी अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे संयम. प्रत्येकालाच, प्रत्येक बाबतीतच संयम शिकविण्याचे काम कोरोनाने केले, असे मला मनापासून ...
औरंगाबाद : माणसासाठी अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे संयम. प्रत्येकालाच, प्रत्येक बाबतीतच संयम शिकविण्याचे काम कोरोनाने केले, असे मला मनापासून वाटते, अशा भावना योगिता सातपुते यांनी काेरोना आणि लॉकडाऊनकडून काय शिकायला मिळाले, याविषयी सांगताना व्यक्त केल्या.
योगिता म्हणाल्या की, अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर पुन्हा फक्त गृहिणी म्हणून घर सांभाळताना अनेक लहान- सहान गोष्टींमध्ये खूप संयम ठेवावा लागतो. कुणीही मदतनीस नसताना गृहिणीपद सांभाळणे हे खरोखरच सगळ्यात अवघड आणि कौशल्याचे काम आहे, हे लॉकडाऊनने पुन्हा एकदा शिकविले.
योगिता यांच्या मते कोरोना, लॉकडाऊनकडून शिकायला मिळालेली दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या गरजा किती कमी असतात आणि केवळ हव्यासच किती मोठा असतो, याची झालेली जाणीव. लॉकडाऊन काळात प्रत्येकाने केवळ आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विनाकारण ‘हे पाहिजे, ते पाहिजे...’ अशी हाव आपोआपच कमी झाली आणि पुन्हा एकदा आपण संयमाने राहणे शिकलो.
कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे, हे या जन्मीच कळाले आणि तेही कोरोनामुळे. काेरोना, लॉकडाऊनमुळे अनेकांचा अहं गळून पडला आणि माणसांची माणसांच्या प्रती असलेली; परंतु काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेलेली सहभावना, संवेदना कोरोना- लॉकडाऊनमुळे जिवंत झाली. माणूस म्हणून आपण स्वत:च स्वतःला नव्याने गवसत गेलो, असेही योगिता यांनी सांगितले.
-योगिता सातपुते, गृहिणी