पासधारकांचे काय करायचे ?
By Admin | Published: August 27, 2014 12:01 AM2014-08-27T00:01:29+5:302014-08-27T00:15:19+5:30
औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे.
औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे. परंतु विविध मार्गांवर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आणि अन्य कारणांचा विचार न करताच उद्दिष्टांपेक्षा कमी प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जात आहे. मग आम्ही पासधारकांना खाली उतरावयाचे काय, असा सवाल बसस्थानकातील वाहकांकडून केला जात आहे.
अभियानात उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन चालक, वाहकांची नावे सूचना फलकावर प्रदर्शित करण्याची सूचना देण्यात आली. तर कमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना आहेत. परंतु प्रवासी वाढविण्यासाठी योग्य ते प्र्रबोधन करण्याऐवजी नाहक मनस्ताप दिला जात असल्याचे वाहकांनी सांगितले. एखाद्या दिवशी कमी प्रवासी वाहतूक झाल्यास दुसऱ्या दिवशी आगार व्यवस्थापकांना भेटल्याशिवाय तिकीट मशीन (ईटीआयएम) दिले जात नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत जर ड्यूटी असेल तर अधिकारी येईपर्यंत वाट बघावी लागते. यामध्ये अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे ड्यूटीचा वेळ अधिक होतो. त्याचा कोणताही विचार केला जात नाही. याचा महिला वाहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या मार्गावर प्रवासी वाहतूक कमी झाली, त्यामागील कोणत्याही कारणांचा विचार केला जात नाही. सुटीचा दिवस, एकाच मार्गावर एकाच वेळी अनेक गाड्या सोडणे, विविध पासधारकांचा विचार न करता कमी प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार धरले जात असल्याचे वाहकांनी सांगितले.