काय सांगता? २९६ रुपयांत घरीच गर्भपात; एमटीपी किटची ऑनलाईन विक्री उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 02:13 PM2022-04-05T14:13:21+5:302022-04-05T14:14:24+5:30
औषधी विक्रेत्याने उघड केला प्रकार, नशेखाेरीसाठीही ऑनलाईन औषधी विक्री
औरंगाबाद : गर्भपातासाठी वापरण्यात येणारी एमटीपी किटची ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ३ दिवसांत ही किट घरपोच मिळते, तेही अवघ्या २९६ रुपयांमध्ये. हा धक्कादायक प्रकार शहरातील एका औषधी विक्रेत्याने उघड केला आहे. नशेखाेरीसाठीही अशा प्रकारे ऑनलाईन औषधी विक्री होत असल्याचा दावा औषधी विक्रेत्याने केला आहे.
निखिल मित्तल असे या औषधी विक्रेत्याचे नाव आहे. डाॅक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषध विक्रेत्यांनी झोपेच्या गोळ्या विकणे बंधनकारक आहे; मात्र डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’ देण्याचा उद्योग सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने २४ मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ऑनलाईनवर डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधी मिळतात, हे प्रशासनासमोर आणण्यासाठी निखिल मित्तल यांनी ३ दिवसांपूर्वी एमटीपी किट ऑनलाईन ऑर्डर दिली होती. डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय त्यांना ५ गोळ्यांची एमटीपी किट सोमवारी प्राप्त झाली.
ऑनलाईन विक्री रोखावी
औषधी विक्रेते हे डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधी देत नाहीत. काही जण देत असतील; पण त्यामुळे सर्वच चुकीचे करतात, असे नाही. नशेसाठी, गर्भपाताची औषधी ऑनलाईनवर डाॅक्टरांच्या चिठ्ठी शिवाय सहज मिळतात. हे सिद्ध करण्यासाठीच ऑनलाईन एमटीपी किट मागविली. अवघ्या तीन दिवसांत ती मिळाली. याप्रकरणी आता प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. ऑनलाईन औषधी विक्री रोखणे गरजेचे आहे.
- निखिल मित्तल, औषध विक्रेता
डाॅक्टरांचा सल्ला, देखरेख गरजेची
गर्भपाताच्या गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि देखरेखीशिवाय घेता कामा नये. कायद्यानुसार ९ आठवडे अथवा ६३ दिवसांपर्यंत या गोळ्या देता येतात. स्वत:हून या गोळ्या घेतल्यास अतिरक्तस्त्राव, अर्धवट गर्भपाताची भीती नाकारता येत नाही. रुग्ण शाॅकमध्येही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक जण या गोळ्या घेतल्यानंतर गंभीर अवस्थेत रुग्णालयात येतात.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख, घाटी
कारवाई केली जाईल
औषधी विक्रेत्याने एमटीपी किटसंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्याकडून औषधी, बिल आणि ऑर्डर्सची माहिती मागवली आहे. ती प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल.
-शाम साळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषधे)