लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे म्हणजे? आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:19 PM2020-05-22T19:19:21+5:302020-05-22T19:21:36+5:30
लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात कोरोनाची लक्षणे नसताना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. शहरात सध्या अशी लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या जास्त आहे. त्यामुळे लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे, याविषयी सर्वसामान्य नागरिकांबरोबर आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना काही होणार नाही, असे म्हणणे चुकीचे असून त्यांच्यामुळे इतरांना बाधा होण्याची शक्यता असते, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जाते. तर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा आजार आपोआप बरा होऊ शकतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यावर भर दिला जात आहे; परंतु सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांविषयी विनाकारण बाऊ केला जात असल्याचे स्वत: डॉक्टर म्हणत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांपासून कोणताही धोका नसतो. त्यामुळेच सध्या सौम्य व अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना ताप नसल्यास व आॅक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के असल्यास दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. तेही कोणत्या तपसणीशिवाय, असे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना हा साधा सर्दीचा आजार आहे. यात ताप, दम लागणे आणि अन्य काही लक्षणे दिसत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले.
केवळ ५ टक्के गंभीर
कोरोनाची लागण झाली तर १०० जणांत ५ टक्के लोकांत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे ५ टक्के लोक म्हणजे वयोवृद्ध, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, मधुमेह, हृदयविकार, टी.बी. यासारखे गंभीर आजार आहे. शहरात सध्या गंभीर आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत अशा रुग्णांचे प्रमाण अधिक दिसत आहे. त्यामुळे ९५ टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता नाही. त्यामुळे खबरदारी आणि साध्या उपचारानेही कोरोना बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
शंका आल्यानंतर तपासणी
शहरात मृत्यूनंतर काहींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. केवळ शंकेवरून स्वॅब घेण्यात आले आणि ते पॉझिटिव्ह आले. मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील लोकांची तपासणी करून खबरदारी घेतली जाते. काही प्रकरणांत संपर्कातील अन्य लोक पॉझिटिव्ह आले, तर काही प्रकरणात मृताशिवाय कोणीही बाधित आढळून आले नाही. असे का होत आहे, याचा शोध घेण्याची गरज असून, मृत्यूनंतर स्वॅब घेणे हे आरोग्य यंत्रणेचे अपयश असल्याची टीकाही होत आहे.
निदान, उपचाराला उशीर
मृत्यूनंतर एखाद्याला कोरोना आहे, हे कळणे, हे अपयश आहे. मृत्यूच्या आधीच का कळले नाही. डॉक्टरांच्या संशयावरून तपासणी केली जाते आणि तेव्हा ते पॉझिटिव्ह आढळून येतात. नातेवाईक आणि संपर्कातील लोकांची तपासणी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे; पण मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह येणे म्हणजे रुग्णाचे निदान, उपचार करण्यास उशीर झाला. त्यामुळे हे अपयशच आहे. मृत्यूनंतर स्वॅब घेणे हे अधिक सोपे असते.
- डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य विश्लेषक
...तर कोरोनाला विसरून जा
कोरोना पॉझिटिव्ह, मात्र ज्यांना ३ ते ५ दिवसांत ताप, उलटी, शौच, श्वास घेण्यास त्रास असे काही नसेल तर त्यांनी घाबरून जाता कामा नये. आपले शरीरच प्रतिकारशक्तीद्वारे आजार बरा करीत असते. सकस आहार घ्यावा. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची खरी गरज आहे. या आजाराचा विनाकारण बाऊ झाला आहे. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आला आणि ३ ते ५ दिवसांत काही लक्षणे नसेल तर कोरोना झाला आहे, हे विसरून गेले पाहिजे.
- डॉ. विजय दहिफळे, सुपरस्पेशालिस्ट