वापरलेल्या मास्कचे काय केले जाते रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:02 AM2021-04-14T04:02:16+5:302021-04-14T04:02:16+5:30
मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग आता प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा एक घटकच बनला आहे. या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांना ...
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग आता प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा एक घटकच बनला आहे. या संसर्गापासून दूर राहण्यासाठी नागरिकांना मागील १३ महिन्यांपासून मास्क वापरावाच लागत आहे. खराब झालेले मास्क नागरिक कचऱ्यात टाकायला तयार नाहीत. शहरातील खाजगी रुग्णालये, महापालिकेच्या कोविड सेंटरमधील बायोमेडिकल वेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात ‘युज अँड थ्रो’ मास्क मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा मागील अनेक वर्षांपासून उभारलेली आहे.
औरंगाबाद शहरात मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाला सुरुवात झाली. मार्च २०२१ पर्यंत कोरोनाने नागरिकांचे आयुष्यच बदलून टाकले. मोठ्या प्रमाणात नागरिक स्वतःच्या सुरक्षेसाठी मास्कचा वापर करू लागले. नागरिक आजही कापडी मास्कला सर्वाधिक पसंती देत आहेत. प्रत्येक नागरिकाकडे किमान दहा मास्क घरात पडलेले असतात. खराब झालेले मास्क कचऱ्यात टाकण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. महापालिकेच्या ओला आणि सुका कचऱ्यामध्ये अत्यंत किरकोळ स्वरूपात अशा प्रकारचे मास्क आढळून येतात. शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचारी युज अँड थ्रोचे मास्क वापरतात. रुग्णालयाच्या बायोमेडिकल वेस्टमध्ये अशा पद्धतीचे मास्क मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारलेली आहे.
कचऱ्यात मास्क अजिबात आढळून येत नाहीत
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आम्ही शहरातील घरगुती कचरा संकलित करीत आहोत. या कचऱ्यामध्ये आजपर्यंत अत्यंत नगण्य स्वरूपात मास्क आढळून येतात. दोन- चार मास्क आढळून आले, तर कर्मचारी ते ड्राय वेस्ट कचऱ्यात टाकतात. महापालिका रुग्णालयांमधील कचरा अजिबात घेत नाही. हा कचरा संकलित करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.
-उमाकांत गोदे, स्वच्छता निरीक्षक, मनपा
रुग्णालयांमधील कचऱ्याचे काय केले जाते
महापालिकेने शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमधील मेडिकल वेस्ट संकलित करण्यासाठी नाशिक येथील एका खासगी कंपनीची नियुक्ती केलेली आहे. एका बेडच्या अनुषंगाने खाजगी रुग्णालय संबंधित कंपनीला पैसे देत आहे. कंपनीने दररोज खाजगी रुग्णालयांमधील कचरा संकलित करणे बंधनकारक केले आहे. मात्र, खाजगी कंपनी दररोज कचरा संकलित न करता आठ दिवसांतून एकदा संकलन करते. शहराबाहेर कंपनीने प्लांट उभारलेला आहे. तेथे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. बायोमेडिकल वेस्ट कलेक्शन करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या कंपनीबद्दल प्रचंड तक्रारी असतानाही प्रशासन कारवाई करीत नाही, हे विशेष.
दररोज कचऱ्यात आढळणाऱ्या मास्कचे काय
महापालिकेकडून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्यात अत्यंत कमी प्रमाणात मास्क आढळून येतात. दिवसभरातून पाच- पंचवीस मास्क जमा झाले तरी ते ड्रायवेस्टमध्ये ठेवण्यात येतात. ड्रायवेस्ट कचरा जमा करून खाजगी सिमेंट कंपनीला देण्यात येतो.
४१०
टन शहरात रोज निघणारा कचरा
३४० टन ओला कचरा
७० टन सुका कचरा