या शांत शहराला नेमके झालेय तरी काय? लुटमार, हाणामारीच्या घटनांत ७० टक्क्यांनी वाढ
By सुमित डोळे | Published: July 19, 2023 11:50 AM2023-07-19T11:50:21+5:302023-07-19T11:55:02+5:30
सहा महिन्यांमध्ये लुटमारीच्या १३१ घटना : गतवर्षीच्या तुलनेत सहा महिन्यांतच ७० टक्क्यांनी वाढला गुन्ह्यांचा दर,
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे शहराचा शैक्षणिक, औद्योगिक दृष्टीने विकास होत असताना दुसरीकडे गुन्ह्यांचा दर वेगाने वाढत असून भाऊ, दादांची, गुन्हेगारांची खुलेआम गुंडगिरी वाढली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये रस्त्यावर लुटमारीच्या १३१ घटना घडल्या असून त्यात ४३ घटनांमध्ये हल्ला करून लुटमार केली गेली. किरकोळ वादातून ६६ ठिकाणी खुनाचे प्रयत्न तर ७५ प्राणघातक हल्ले झाले. अनेक घटनांमध्ये सर्रास शस्त्रे उपसली जात आहेत. गतवर्षी खुनाच्या प्रयत्नांच्या घटना ४८ तर लुटमारीच्या १३२ घटना होत्या. त्यामुळे सहा महिन्यांतच ७० टक्क्यांनी गुन्ह्यांचा दर वाढला असल्याची चिंताजनक बाब गुन्ह्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
शहर पोलिस दलात आता साडेतीन हजार पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसह १८ पोलिस ठाणी आहेत; परंतु, गेल्या चार वर्षांमध्ये शहरातील गुन्हेगारीने वेगाने डोके वर काढले. पैसे, लुटमारीसाठी कुख्यात गुन्हेगारांसह नव्याने उदयास येणाऱ्या भाऊ- दादांकडूनही आता प्राणघातक हल्ला करण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
प्राणघातक हल्ले, लुटमारीची शहरात दहशत
महिना खून खुनाचा प्रयत्न हत्याराने जबरी मारहाण
जानेवारी २ २ ८
फेब्रुवारी १ ९ ११
मार्च १ ५ १०
एप्रिल ५ ६ ११
मे २ २२ १७
जून १ १७ १३
जुलै (१५) २ ५ ५
एकूण १५ ६६ ७५
लुटमारीच्या घटना
महिना लुटमार दुखापत पोहोचवून लुटमार
जानेवारी १२ ६
फेब्रुवारी ४ ७
मार्च ७ ११
एप्रिल २४ ५
मे १९ १०
जून १४ ३
जुलै (१५) ८ १
एकूण ८८ ४३
सहनशीलता संपली, हाणामारी रेकॉर्डब्रेक
- किरकोळ वादातून एकमेकांना मारहाण, जमावाने एखाद्याला गंभीर दुखापत पोहोचण्याच्या ४०४ घटना घडल्या. यात ७५ टक्के घटना वादातून झाल्या तर पंचवीस टक्के घटनांत नाहक मारहाण करण्यात आली.
- जमाव जमणे, दोन गटांत तुंबळ हाणामारीच्या ५३ घटना घडल्या.
गंभीर लुटमारीच्या घटनांमध्ये निश्चित घट - पोलिस आयुक्त मनोज लोहिया
१. लुटमारीच्या घटनांमध्ये शहरात वाढ झाली आहे ?
- मोबाईल हिसकावून नेल्यावर गंभीर शिक्षा व्हावी म्हणून आता आम्ही भादंवि ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल करत आहाेत. या गुन्ह्यांत वाढ आहे; परंतु गंभीर दुखापत करून लुटमारीच्या घटनांमध्ये निश्चित घट झाली आहे.
२. चाकू दाखवून खंडणी, धमकावण्याच्या घटना घडल्या आहेत ?
-अशा घटना गांभीर्याने घेऊन तत्काळ कारवाई होत आहे. मी सातत्याने अशा घटनांचा आढावा घेतो.
३. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी अधिकाऱ्यांना काय सूचना आहे ?
-रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी नव्या पद्धतीने काम सुरू आहे. लवकरच अशांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाईल. नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी ठोस पाऊले उचलली जात आहेत.