धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:02 AM2021-06-28T04:02:26+5:302021-06-28T04:02:26+5:30
औरंगाबाद : सत्ता द्या, चार महिन्यांत ओबींसींना आरक्षण नाही मिळवून दिले तर राजकीय संन्यास घेईन, असे म्हणणाऱ्यांनी मागेही सत्ता ...
औरंगाबाद : सत्ता द्या, चार महिन्यांत ओबींसींना आरक्षण नाही मिळवून दिले तर राजकीय संन्यास घेईन, असे म्हणणाऱ्यांनी मागेही सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ सांगितले होते त्याचे काय झाले, असा टोला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मोघे यांच्यावर मराठवाडा निरीक्षक पदाची सोपवण्यात आल्यानंतर कालपासून त्यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे. आज गांधी भवनात दुपारी त्यांनी शहर कॉंग्रेसची व नंतर जिल्हा कॉंग्रेसची बैठक घेतली. सकाळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मोघे म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण? देऊ असे म्हणणाऱ्यांनी दिले का आरक्षण? आता म्हणतात, मी चार महिन्यांत ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण? मिळवून देतो. यांचं काही खरं नाही. हे भावनेच्या आहारी जाऊन बोलत आहेत. मी पुन्हा? येईन, पुन्हा? येईन, असे वारंवार सांगत होते. आले का पुन्हा? आताही परत काही येणं नाही, काही देणं नाही, घेणं नाही'
कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण कुणालाही मिळायला पाहिजे. मराठा समाजालाही मिळायला पाहिजे, धनगर समाजालाही मिळायला पाहिजे. येत्या सहा महिन्यांत न्यायालयाने द्यायला सांगितलेले मुस्लीम आरक्षण देण्यात येईल, असा मला विश्वास वाटतो, असे मोघे म्हणाले.
आगामी काळात कॉंग्रेसलाच चांगले दिवस येतील. ताकद वाढेल. स्वबळावर लढायचे की नाही, हे श्रेष्ठी ठरवतील. पण स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात काही चूक नाही, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी आमदार एम. एम. शेख, विलासबापू औताडे, किरण पाटील ड़ोणगावकर, डॉ. जितेंद्र देहाडे, नामदेव पवार, मोईन हर्सूलकर, संतोष भिंगारे, इक्बालसिंग गिल आदींची यावेळी उपस्थिती होती.
चौकट..
विनायक मेटे यांंना टोला
काल औरंगाबादेत विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण संघर्ष मेळाव्यात बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती व त्यांना मूर्ख संबोधले होते. पत्रकारांनी यासंदर्भात मोघे यांना छेडले असता ते म्हणाले की, अशोक चव्हाण यांना जो कोणी मूर्ख म्हणत असेल, तो महामूर्खच होय.