औरंगाबादला झाले तरी काय? सिडकोत गोळीबार, चिकलठाण्यातही रिव्हॉल्व्हरची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 11:46 AM2022-06-27T11:46:12+5:302022-06-27T11:46:41+5:30
अल्पवयीनसह पाच जणांना अटक : एकाला जामीन, तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी
औरंगाबाद : सिडको उड्डाणपुलाजवळील रामगिरी हॉटेलच्या खाली शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाच जणांमध्ये आपसात तुफान हाणामारी सुरू होती. त्यातील एकाजवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी झाडली. या घटनेपूर्वी चार जणांनी चिकलठाण्यातील एका टपरीवर उभ्या असलेल्या युवकांना रिव्हॉल्व्हर दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे.
सिडको पोलिसांनी नीलेश सुदाम देहाडे, निखिल विजयानंद आगलावे (दोघे रा. ठाकरेनगर, विनय कॉलनी, सिडको), शिवराज दत्तात्रय संबळे, योगेश नागोराव हेकाडे (दोघे रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. या पाच जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. नीलेशजवळ असलेले रिव्हॉल्व्हर त्याने शिवराजवर रोखून धरले होते. त्यापूर्वी त्याने एक गोळीही झाडल्याचे उपस्थितांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत आराेपींनी तशी कबुली दिलेली नाही. न्यायालयाने शिवराज संबळे यास जामीन मंजूर केला तर तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. दरम्यान, सिडको पोलीस ठाण्यात ड्युटी इन्चार्ज असलेले उपनिरीक्षक बुधा शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी अरेरावी केल्याचा प्रकारही मध्यरात्री घडला.
चिकलठाण्यातही गोळीबार का?
चिकलठाणा भागातील द्वारकेश मार्केटसमोरील एका टपरीवर काळे शर्ट घातलेले चार युवक दुचाकीवर आले. त्यातील एका जणाच्या हातात रिव्हॉल्व्हर होते. त्याने ते तेथील उपस्थित युवकांवर रोखून धरले. त्यामुळे एकच घबराट निर्माण झाली. त्या युवकाने गोळी झाडल्याचा दावा उपस्थितांनी केला आहे. त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्यानंतर ते युवक मिनी घाटीजवळ थांबले. त्यांचा पाठलाग करीत टपरीवरील युवक मिनी घाटीजवळ येताच तेथून त्यांनी सिडकोच्या दिशेने धूम ठोकल्याची माहिती उपस्थितांनी दिली. त्यामुळे चिकलठाण्यातही गोळीबार झाला का, असा प्रश्न आहे.