शहागंजमधील १०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाचे काय झाले? घोषणा करून वर्ष उलटले
By मुजीब देवणीकर | Published: June 20, 2024 06:26 PM2024-06-20T18:26:03+5:302024-06-20T18:27:13+5:30
राज्य शासनाने १०० खाटांचे सहा मजली भव्य महिला व बाल रुग्णालय उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली.
छत्रपती संभाजीनगर : शहागंज येथील दुर्गाप्रसाद आरोग्यधामच्या जागेवर १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय उभारण्यात येईल. त्यासाठी लागणारी संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, राज्य शासन २३ कोटी रुपयेही देणार असल्याची माहिती मागील वर्षी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली होती. मात्र, वर्ष उलटले तरी अद्याप रुग्णालय उभारण्याच्या प्रक्रियेत किंचितही प्रगती झालेली नाही.
अनेक दशकांपासून घाटी रुग्णालय आरोग्यधाम येथे बाह्यरुग्ण विभाग चालवत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. घाटी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तत्कालीन मनपा प्रशासक आदींनी जागेची पाहणी केली होती. रुग्णालय उभारणीसाठी अतिरिक्त जागा लागत होती. महापालिका प्रशासनाने त्वरित शेजारील जागाही उपलब्ध करून दिली. ३ हजार २०० चौरस मीटर जागा आता उपलब्ध झाली. त्यानुसार डीपीआर तयार करून शासनाला सादर करण्यात आला.
राज्य शासनाने १०० खाटांचे सहा मजली भव्य महिला व बाल रुग्णालय उभारण्यास तत्त्वत: मंजुरी दिली. लवकरच २३ कोटींच्या निधीला मंजुरी मिळेल, अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती. घाटी रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रचंड ताण असून, अनेक महिलांना जमिनीवर गादी टाकून दिली जाते. १०० खाटांच्या या रुग्णालयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, वर्षे उलटल्यानंतरही रुग्णालय उभारणीसाठी किंचितही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जुन्या शहरातील शहागंज भागात रुग्णालयाची नितांत गरज आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी तरी रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.