मराठवाड्यात जमिनीखाली दडलेय काय? छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता आंबेजोगाईत उत्खनन
By संतोष हिरेमठ | Published: March 28, 2024 01:21 PM2024-03-28T13:21:40+5:302024-03-28T13:22:08+5:30
आंबेजोगाई (जि. बीड) येथील सकलेश्वर मंदिर(बाराखांबी) येथे उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात अजूनही ‘इतिहास’ जमिनीखालीच दडलेला आहे. छत्रपती संभाजीनगरात जगप्रसिद्ध बीबी का मकबरा परिसरातील उत्खननात जुने अवशेष उघडे पडले. छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता आंबेजोगाईतील सकलेश्वर मंदिर परिसरात उत्खनन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वीही मराठवाड्यात ठिकठिकाणी जमिनीखालून इतिहासाचा उलगडा झालेला आहे.
जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबरा परिसरात गेल्या महिनाभरात झालेल्या उत्खननात अनेक पुरातन वस्तू आणि रचना सापडल्या. यापाठोपाठ आंबेजोगाई (जि. बीड) येथील सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरात १५ मार्चपासून उत्खनन (सायंटिफिक क्लिअरन्स) सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी येथे २०१८ मध्ये उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा तीन पुरातन मंदिरांचे अवशेष आढळून आले होते. आता गेल्या १० दिवसांच्या उत्खननात आणखी दोन मंदिरांचा पाया आढळून आला आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहणे, उत्खनन संचालक अमोल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास ५० जणांचे पथक सकलेश्वर मंदिर परिसरात उत्खननाचे काम करीत आहे.
औसा किल्ला परिसरात तोफगोळे, हत्यारे...
औसा किल्ला परिसरात जतन व दुरुस्तीच्या कामादरम्यान खोदकाम करताना तोफगोळे, दगडी, धातूची हत्यारे सापडली होती. त्यामुळे या परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करणे गरजेचे असल्याचे समोर आले. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी उत्खननासाठी १.१० कोटींचा निधी मंजूर झाला.
यापूर्वी मराठवाड्यात कुठे उत्खनन?
जगप्रसिद्ध वेरुळ या ठिकाणी इतिहासाची साक्ष देणाऱ्या श्री. मालोजीराजे भोसले गढी येथे २००५ ते २००६ मध्ये उत्खननात काही अवशेष आढळले होते. या उत्खननात जवळपास ६९ दुर्मीळ पुरातन वस्तू सापडल्या. त्यामध्ये लाल दगडात घडवलेली गणेशमूर्ती, भाग्य रत्ने, मातीचे दिवे, बांगड्या, कांस्य नाणी, चांदीच्या अंगठ्या, घराचा पाया इत्यादींचा समावेश होता. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचा सखोल अभ्यास करून या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या. भोकरदन व तेर येथील उत्खननात इ. स. पूर्व ३०० ते २०० दरम्यानचे अवशेष सापडले. मौल्यवान दगड, मणी, भाजलेल्या मातीची भांडी, मूर्ती, दैनंदिन वापराच्या वस्तू, हस्तिदंती शिल्पांचा यात समावेश होता. दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी केलेल्या उत्खननात मध्ययुगीन काळातील अवजारे, बाणाचे टोक, चाकू, खिळे, कुलपाची चावी आदी वस्तू सापडल्या. त्याबरोबरच लातूर, पैठण येथेही उत्खनन करण्यात आले होते.