थंडीत मुलांसाठी कोवळे ऊन महत्त्वाचे कशासाठी? जाणून घ्या फायदे
By राम शिनगारे | Published: January 18, 2024 07:25 PM2024-01-18T19:25:55+5:302024-01-18T19:26:07+5:30
सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व डी प्राप्त होते.
छत्रपती संभाजीनगर : सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यातच शरीरात आयर्न कमी असेल तर ते भरून निघण्यास मदत होते. त्वचेचा संसर्ग, थकवा, अशक्तपणासह इतर आजारांना कमी आयर्नमुळे सामोरे जावे लागते. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे हे आजार कमी होण्यास मदत होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात मुलांना कोवळे ऊन फायदेशीर ठरते.
कोवळ्या उन्हातून मुलांना काय मिळते?
सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्याने शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व डी प्राप्त होते. शरीर उबदार राहते. पुरेशी आणि आरामदायी झोप लागते. लहान मुलांमध्ये कावीळ होण्याची शक्यता कमी असते. यासह अनेक आरोग्यदायी फायदे मुलांना मिळतात.
जि. प. शाळांचा पहिला तास व्हरांड्यातच व्हायचा
काही वर्षांपूर्वी खूप थंडी पडलेली असेल तर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये प्रार्थना झाल्यानंतर पहिला तास व्हरांड्यातच होत असे. त्यामुळे मुलांना कोवळ्या उन्हासह थंडीपासून बचाव होण्यास मदत होत होती.
आता सर्व तास बंद खोलीत
खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये आता वर्गखोल्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे आता सर्व तास बंद खोल्यांमध्येच घेतले जातात. त्यामुळे मुलांना थंडीत उन्हापासून बचाव करण्याची संधीच मिळत नसल्याचेही दिसून येते.
दुपारी तीन वाजेनंतरचे ऊन द्यायला पाहिजे
व्यक्तीची त्वचा म्हणजे ‘व्हिटॅमिन डी’ तयार करणारी फॅक्टरी आहे. सूर्यकिरणे हा त्यांचा कच्चा माल आहे. सकाळची सूर्यकिरणे ही तिरपी पडतात. त्यामुळे ‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण कमी होते. त्यामुळे थंडीमध्ये लहान मुलांना दुपारी तीन वाजेनंतरचे ऊन द्यायला पाहिजे. तेव्हा किरणे ९० अंशांच्या कोनात पडलेली असतात. या उन्हामुळे शरीरातील हाडे बळकट होतात. हृदय व किडनीचे कार्य नॉर्मल ठेवण्यास मदत होत असते.
-डॉ. यशवंत गाडे, अस्थिरोगतज्ज्ञ