स्मार्ट सिटीचे कॅमेरे काय कामाचे? वाहन क्रमांक, साखळी चोर दिसत नाहीत
By मुजीब देवणीकर | Published: April 27, 2024 08:02 PM2024-04-27T20:02:53+5:302024-04-27T20:03:20+5:30
स्मार्ट सिटीने सीसीटीव्ही बसविताना मोठा गाजावाजा केला होता. या सीसीटीव्हीचे फायदे किती याची लांबलचक यादीच देण्यात आली होती.
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीमार्फत तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून शहरात ७५० अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास याच कॅमेऱ्यामार्फत वाहनधारकांना पावती येते. जेव्हा एखाद्या अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनाचा शोध घ्यायचा तर वाहन क्रमांक दिसत नाही. महाविकास आघाडीच्या रॅलीत सोन्याची चेन पळविणाऱ्या चोरट्यांचे फोटो सापडत नाहीत. मग स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटीने सीसीटीव्ही बसविताना मोठा गाजावाजा केला होता. या सीसीटीव्हीचे फायदे किती याची लांबलचक यादीच देण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या भीतीपोटी मुख्य रस्त्यांवरील मंगळसूत्र चोरीच्या घटना कमी झाल्या. मात्र, विविध घटना, गुन्ह्यांच्या तपासात या कॅमेऱ्यांचा खूप फायदा होईल, म्हणून पोलिस आयुक्त कार्यालयात कोट्यवधी रुपये खर्च करून कमांड सेंटर उभारले. दुसरे कमांड सेंटर स्मार्ट सिटी कार्यालयात आहे. पोलिसांना या कॅमेऱ्यांचा तपासात अधिक फायदा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रात्री तर या कॅमेऱ्यांचा काहीच उपयोग नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नाइट व्हीजन सिस्टमच यात नाही. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास आंबेडकरनगर येथे आठ दिवसांपूर्वी एक अपघात झाला. या अपघातात मोंढ्यातील एका कामगाराला चारचाकी वाहनाने उडविले. हे वाहन पोलिसांना कॅमेऱ्यात दिसत आहे. मात्र, क्रमांक दिसत नाही.
दुसरे उदाहरण द्यायचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी रॅलीने अर्ज दाखल केला. माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्यासह सातजणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरांनी लांबविल्या. दिवसा चोरूनही सीसीटीव्हीत आरोपी दिसत नाहीत. कॅमेरा झूम करून पाहिला तर चेहराच दिसत नाही. त्यामुळे सीसीटीव्हीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही प्रकल्पाचे प्रमुख फैज अली यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
सर्वच कॅमेरे बोगस
स्मार्ट सिटीचे सर्व कॅमेरे बोगस आहेत. एकाही कॅमेऱ्यात चेहरा दिसत नाही. काहींचे तर अँगल चुकीचे आहेत. औपचारिकता म्हणून बसविले आहेत. साखळीचोर शोधण्यासाठी पोलिस, रॅलीचे शूटिंग करणारे, मोबाइलमध्ये केलेली शूटिंग, खासगी कॅमेऱ्यांची मदत घेऊन पोलिस तपास करीत आहेत. लवकरच आरोपी सापडतील.
- सुदाम सोनवणे, माजी महापौर