अधिक मास अन् उसाच्या रसाचा संबंध काय? रसवंतींवर अचानक गर्दी, २५ क्विंटल ऊस संपला
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 24, 2023 12:39 PM2023-07-24T12:39:57+5:302023-07-24T12:44:56+5:30
उन्हाळ्यात नव्हे पावसाळ्यात मागणी; नागरिकांनी रांगा लावून पार्सलमध्ये नेला उसाचा रस
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे यामुळे शहरात बोटावर मोजण्याइतक्या रसवंती सुरू असून रविवारी अचानक ग्राहकांची एवढी गर्दी वाढली की, रसवंतीमधील २५ क्विंटल ऊसच संपून गेला. शहानूरमिया दर्गा परिसरात चक्क रसासाठी रांगा लागल्या होत्या. ज्यांना रस मिळाला ते तो रस पीत नव्हते तर घरी पार्सल घेऊन जाताना दिसले.
भर उन्हाळ्यात उसाचा रस पिण्यासाठी एवढी गर्दी वाढली नव्हती. मग, पावसाळ्यात, तेही रविवारच्या दिवशी अचानक रसाला एवढी मागणी का वाढली. ग्राहकांची रसवंतीवर गर्दी का उसळली, याचे कारणही रसवंती मालकाला कळेना. प्रत्येक ग्राहक घाईघाईत येत होता व एक ग्लास, दोन ग्लास उसाचा रस तेही पार्सल मागत होता. रसवंतीमध्ये कोणीच रस पीत नव्हते. जो तो रस पार्सल मागवित असल्याने हा प्रकार काय आहे, या विचाराने रसवंती मालकांचे डोके चक्रावून गेले होते. मागणी एवढी होती की, दुपारी १२ वाजेपर्यंत रसवंतीमधील सर्व ऊस संपला होता. रसवंतीच्या मालकाने मोबाइलवर उसाची ऑॅर्डर दिली पण उस रसवंतीपर्यंत येण्यास २ ते ३ तास लागणार होते. त्यात आता उसाचा हंगाम संपत आल्याने लवकर ऊस मिळणे कठीण झाले होते. शहरातील नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातूनही लोक उसाचा रस खरेदीसाठी शहरात येऊ लागल्याने व वाढत्या गर्दीमुळे अखेर रसवंतीवाल्यांनी आपली दुकाने बंद करून टाकली होती. असंख्य ग्राहकांना रस न मिळाल्याने खाली हात जावे लागले.
का वाढली अचानक उसाच्या रसाला मागणी
अधिक मास सुरू आहे. या काळात तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. विशेषत: अधिक मासाच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा, यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते, असे शास्त्रात लिहिले आहे. यामुळे शनिवारी व रविवारी उसाचा रस खरेदीसाठी रसवंतीवर गर्दी उसळली होती.
शहरात एकच चर्चा
तुळशीला उसाचा रस अर्पण करावे ही एकच चर्चा शहरात दिसून आली. घरोघरी तुळशीला रस अर्पण करण्यासाठी लगबग सुरू झाली होती. तुळशीची पूजा कशी करावी, यासाठी सोशल मीडियावर अनेक मेसेज, व्हिडीओ शेअर केले जात होते.
दुपारीच शटर बंद करावं लागले
शनिवारी सकाळपासूनच ऊसाचा रस पार्सल नेण्यासाठी रसवंतीवर गर्दी होती. मात्र, आज एवढी गर्दी उसळली की, दुपारिच शटर खाली घ्यावे लागले. पावसाळा असला तरी सध्या दररोज २०० ते ३०० ग्लास रस विकला जातो. मात्र, आज ५ हजार ग्लास उसाचा रस विकल्या गेला आणि तेही सर्व ग्राहकांनी पार्सल नेला. ऊस उपलब्ध नसल्याने अखेर रसवंतीचे शटर खाली घ्यावे लागले.
- माजीद खान, रसवंती मालक