आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते? शिक्षण, करिअरमुळे लग्न उशिरा करणाऱ्यांची संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:34 PM2022-02-28T15:34:06+5:302022-02-28T15:34:29+5:30
पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मुलगी असो की मुलगा, आधी लग्नाचा विचार केला जात असे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शिक्षण आणि करिअरमुळे लग्न उशिरा करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. त्यामुळे आपोआप पहिले मूल होऊ देण्याचे वयदेखील वाढले आहे. त्यातूनच अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे योग्य वयात आई-बाबा होणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मुलगी असो की मुलगा, आधी लग्नाचा विचार केला जात असे. परंतु सध्या शिक्षण घेतानाच वय २१ वर्षे उलटतात. त्यानंतर करिअरचा विचार केला जातो. त्यामुळे २५ वर्षानंतर लग्नाचा विचार सुरू केला जातो.
आई होण्याचे योग्य वय कोणते?
तज्ज्ञांच्या मते आई होण्याचे २१ ते ३० वर्षे हे योग्य वय ठरते. या वयादरम्यान पहिले मूल होणे अधिक सुरक्षित असते. वयाच्या ३५ व्या वर्षी दुसरे मूल झाले तरी वैद्यकीय दृष्ट्या क्वचित एखादी समस्या उद्भवते. परंतु वयाच्या ३५ वर्षांनंतर पहिले मूल होऊ देणे हे काहीचे चिंतादायक ठरू शकते.
बाबा होण्याचे योग्य वय कोणते?
मूल जन्माला घालण्यासाठी पुरुषाचे योग्य वय कोणते याचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. पुरुषांमध्ये फर्टीलिटी प्रभावित करणारा मुख्य घटक आहे टेस्टोस्टेरोनचा स्तर. ३५ वर्षाच्या आत बाबा होणे हे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वय वाढले तर...
वय वाढल्यानंतर मधुमेह, हायपरटेन्शन यासह इतर आजारांना महिला, पुरुषांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वय वाढले तर आई-बाबा होण्यासाठी अडचणी येतात. मग अनेक दाम्पत्ये डाॅक्टरांकडे धाव घेतात. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल डायबिटीज असे म्हणतात. ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया जेव्हा आई होऊ पाहतात, तेव्हा त्यांच्या शरीरात ही समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
माता, शिशूची सुरक्षितता
लग्नाचे वय वाढले आहे. परंतु उशिरा मूल होण्याचा आईबरोबर शिशूलाही धोका होऊ शकतो. त्यामुळे २१ ते ३० वर्षे या वयात पहिले मूल होणे योग्य असते. म्हणजे या वयात आई होणे अधिक सुरक्षित असते.
- डाॅ. सोनाली देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग विभाग, घाटी
संगोपनासाठी महत्त्वाचे
योग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच बालकांच्या संगोपनाच्या दृष्टीने योग्य वयात आई-बाबा होणेही गरजेचे आहे. २१ ते ३० वर्षे या वयात आई होणे अधिक योग्य ठरते.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा रुग्णालय