काय हा घोळ ? ‘आरटीओ’त सुटीच्या दिवशी कामावर फिरवतात शेवटचा ‘हात’
By संतोष हिरेमठ | Published: August 21, 2023 08:20 PM2023-08-21T20:20:06+5:302023-08-21T20:20:20+5:30
‘आरटीओ’त रविवारी चालते काही कर्मचाऱ्यांकडून कामकाज
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात चक्क सुट्टीच्या दिवशी, रविवारी वाहनांसंबंधी विविध कामकाज करण्याचा ‘उद्योग’ सुरु असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसला. कार्यालयाचे दार उघडून काही कर्मचाऱ्यांकडून वाहनांच्या कागदपत्रांवर शेवटचा ‘हात’ फिरविला जात आहे.
आरटीओ कार्यालयात सुट्टीच्या दिवशी काही कर्मचाऱ्यांकडून कामकाज केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारी थेट आरटीओ कार्यालय गाठून पडताळणी केली. तेव्हा अंधार पडलेल्या कार्यालयात कक्षासमोर कर्मचारी कागदपत्रांची हाताळणी करताना दिसून आला. तसेच नव्या रूपातील वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि वाहन परवाना (लायसन्स) देण्याचे कंत्राट कर्नाटकातील एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स चाचणी कक्षाच्या परिसरात जागा देण्यात आली. या ठिकाणीही कर्मचारी दिसले.
सुट्टीच्या दिवशीचे कर्तव्य नाही, मंग का?
सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कर्मचाऱ्याला ड्युटी लावली जात नाही. यासंदर्भात विचारणा केल्यानंतर शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी, कामाचा भार कमी करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी काम करीत असल्याचे सांगण्यात आले.
वीज गेलेली, इतर कर्मचारी आले नाही
आऱटीओ कार्यालयात सुट्टीच्या दिवशीही काही जणांकडून काम केले जाते. रविवारी आरटीओ कार्यालयात वीजपुरवठा खंडित झालेला होता. याची माहिती सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना मिळालेली होती. त्यामुळे त्यांनी कार्यालयात येण्याचे टाळले. यावरून संगणकीय कामकाजही सुट्टीच्या दिवशी केली जात असल्याचे दिसले.
कर्मचाऱ्याला विचारलेले प्रश्न
प्रतिनिधी : तुम्हाला सुट्टीच्या दिवशी ड्युटी लावली आहे का?
कर्मचारी : नाही,
प्रतिनिधी : मग सुट्टीच्या दिवशी कसे?
कर्मचारी : दर शनिवारी, रविवारी येत असतो. काम करतो. सोमवारी सर पेपरवर सह्या करतात.
प्रतिनिधी : इतर कोण कोण कर्मचारी येतात?
कर्मचारी : ज्यांचे काम आहे, ते येत असतात.
कर्मचारी स्वत:हून येतात
पेंडिंग कामासाठी विशेषत: नाॅन ट्रान्सपोर्टच्या कामासाठी काही कर्मचारी स्वत:हून शनिवारी, रविवारी कार्यालयात काम करतात. जुने आरसी पेंडिंगच्या कामासाठी, वाहनाच्या नव्या सिरीजसंदर्भातील काही कर्मचारीही येतात. याविषयी कल्पना आहे.
-विजय काठोळे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी