हे काय? ४० वर्षांपासून शासकीय दंत रुग्णालयात औषधींना ठेंगा!
By संतोष हिरेमठ | Published: May 12, 2023 01:21 PM2023-05-12T13:21:33+5:302023-05-12T13:23:41+5:30
रुग्णालयात औषधालयच गायब, औषधी-गोळ्या मिळतच नाहीच, मेडिकल गाठण्याचीच वेळ, रुग्णांच्या खिशालाच कात्री
छत्रपती संभाजीनगर : सरकारी रुग्णालय म्हटले की, तपासणीबरोबर काही प्रमाणात का होईना, रुग्णांना औषधी मिळतात. परंतु शहरातील एक शासकीय रुग्णालय असे आहे की, जेथे गेल्या ४० वर्षांपासून रुग्णांना औषधीच मिळत नाही. कारण या ठिकाणी औषधालयच नाही आणि शासनाकडूनही औषधी-गोळ्यांचा पुरवठा होत नाही. हे रुग्णालय म्हणजे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय. दातांचे उपचार घेताना औषधी लागली तर ती रुग्णांना मेडिकलवरूनच खरेदी करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दंतोपचारासाठी दररोज संपूर्ण मराठवाड्यासह लगतच्या भागातून रुग्ण दाखल होतात. खाजगी रुग्णालयांत दातांचे उपचार घेणे गोरगरीब आणि सर्वसमान्यांना परवडत नाही. त्यामुळेच शासकीय दंत महाविद्यालय सर्वसामान्यांच्या मुखआरोग्यासाठी आधारवड ठरत आहे. वैद्यकीय तपासण्यांपासून तर उपचार या ठिकाणी मिळतात. परंतु औषधी मात्र बाहेरून घेण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यासाठी रुग्णांना मेडिकलचा रस्ता दाखविला जात आहे.
रोज किती रुग्ण?
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ९ विभागांच्या माध्यमातून विविध दंतोपचार होतात. एका विभागात दररोज ५० ते ६० रुग्णांवर उपचार होतात. त्यानुसार दररोज ४०० ते ५०० रुग्ण उपचार घेतात.
कोणती औषधी लागतात?
दात काढणे, रूट कॅनाॅल, सर्जरीच्या रुग्णांना प्रामुख्याने पेनकिलर, अँटिबोयोटिक द्यावी लागतात. आजघडीला ही औषधी रुग्णांना स्वत:चा खिसा रिकामा करत बाहेर खासगी मेडिकलमधूनच घ्यावी लागत आहेत.
किती बसतो भुर्दंड?
पेनकिलर, अँटिबोयोटिकसाठी रुग्णांना अगदी १०० रुपयांपासून तर ५०० रुपयांपर्यंत मोजावे लागतात. ही औषधी लागणाऱ्या ‘डेंटल’च्या रुग्णांनी घाटीतील बाह्यरुग्ण विभागात मेडिसीन विभागात गेले पाहिजे, असे शासकीय दंत महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून सांगितले जाते.
‘डेंटल’ मेटेरियलसाठीच निधी
दंतोपाचारासाठी लागणाऱ्या साहित्यांचा (डेंटल मेटेरियल) पुरवठा होतो. परंतु औषधी-गोळ्यांचा पुरवठा होत नाही. राज्यभरातील शासकीय दंत महाविद्यालयात हीच स्थिती आहे. रुग्णालयात औषधालय गरजेचे आहे. परंतु त्यासाठी फार्मासिस्ट, सहायक, चतुर्थश्रेणी कर्मचारी लागतील. औषधींही पुरवठा झाला पाहिजे, असे डाॅक्टरांनी म्हटले.
काय म्हणाले अधिष्ठाता?
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. एस. पी. डांगे म्हणाले, रुग्णालयाला डेंटल मटेरियल पुरवठा होतो. औषधी-गोळ्या मिळत नाही. दोनच विभागातील रुग्णांना पेनकिलर आणि अँटिबायोटिक द्यावी लागतात. ती घाटी रुग्णालयातून घेता येतात. डाॅक्टरांनी कुणालाही बाहेरून औषधी घेण्यासाठी लिहून देता कामा नये. ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू झाल्यानंतर आमच्याकडील रुग्णांना थेट घाटीतून औषधी घेता येईल, असे नियोजन होऊ शकते.