असा कोणता स्ट्रेन आहे, रुग्ण १२ अन् २४ तासांतच दगावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:04 AM2021-04-02T04:04:56+5:302021-04-02T04:04:56+5:30

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. काही दिवसांपासून खासगी रुग्णालये आणि घाटीत मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली ...

What kind of strain is this, the patient is dying in 12 to 24 hours | असा कोणता स्ट्रेन आहे, रुग्ण १२ अन् २४ तासांतच दगावतोय

असा कोणता स्ट्रेन आहे, रुग्ण १२ अन् २४ तासांतच दगावतोय

googlenewsNext

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. काही दिवसांपासून खासगी रुग्णालये आणि घाटीत मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे रुग्ण दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ किंवा २४ तासांतच दगावत आहे. ६० ते ८५ वर्षे वयोगटातील नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू होतोय. काही रुग्ण आठ ते दहा दिवस उपचार घेतल्यानंतरही दगावत आहेत हे विशेष. कोरोनाचा असा कोणता स्ट्रेन आहे जो विविध उपचारांनाही जुमानत नाही, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

१५ मार्चपासून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा मृत्यू जास्त प्रमाणात होत आहे. दररोज १५ ते २० नागरिकांचा मृत्यू होत आहे. कालपर्यंत घाटीत सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण होते. आता खासगी रुग्णालयांमध्येही मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचे तांडव थांबवावे तरी कसे, असा प्रश्न डॉक्टरांनाही पडला आहे. बुधवारी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात मनपा हद्दीतील तब्बल चौदा नागरिकांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. यातील चार नागरिकांचा अवघ्या १२ तासांत मृत्यू झाला आहे. एका नागरिकाचा २४ तासांत मृत्यू झाला आहे. घाटी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल गंभीर रुग्णांचे मृत्यूसत्र थांबविण्यासाठी डॉक्टर २४ तास शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कोरोनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व औषधांचा वापर करूनही रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश येत नाही. डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या औषधांना वयोवृद्ध रुग्णांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनचा मुकाबला तरी कसा करावा, असा प्रश्न पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अवघ्या काही तासांचे मृत्यूचक्र

१) गजानन कॉलनी येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाला २७ मार्चला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ३० रोजी मृत्यू झाला.

२) मजनू हिल येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाला ३० रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले. याच दिवशी अवघ्या काही तासांत मृत्यू झाला.

३) एन ४ येथील ८३ वर्षीय महिला रुग्णाला खासगी रुग्णालयात ३० रोजी दाखल केले होते. अवघ्या काही तासांतच त्यांचाही मृत्यू झाला.

४) ७९ वर्षीय पुरुष रुग्णाला हेडगेवार हॉस्पिटलमध्ये २८ रोजी दाखल केले. ३१ रोजी मृत्यू झाला.

५) प्रगती कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुषाला घाटीत २८ मार्च रोजी दाखल केले आणि ३१ रोजी मृत्यू झाला.

रुग्ण उशिराने येण्याचे एक प्रमुख कारण

काेरोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण तपासणीच करत नाहीत. विविध आजार असलेल्या नागरिकांनी तरी वेळेवर तपासणी करून औषधोपचाराला सुरुवात केली पाहिजे. उशिराने दाखल होणाऱ्या रुग्णांवर औषधोपचार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वेळेवर निदान झाल्यानंतर उपचार सुरू झाल्यास प्राण वाचू शकतात. घाटी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मरण पावत असलेल्या रुग्णांची मृत्यूची कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रमुख कारणांचा शोध घेण्यात येईल. उशिराने दवाखान्यात येणे हे एक कारण असू शकते.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

Web Title: What kind of strain is this, the patient is dying in 12 to 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.