लाॅकडाऊनने काय शिकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:04 AM2021-03-20T04:04:52+5:302021-03-20T04:04:52+5:30
वकिलांना अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनविले -ॲड. सगर किल्लारीकर वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले, वेळेचीही बचत करायला ...
वकिलांना अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनविले -ॲड. सगर किल्लारीकर
वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले, वेळेचीही बचत करायला शिकलो...
बी. एल. सगर किल्लारीकर, उच्च न्यायालयातील वकील
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी बंद होती. त्याकाळात केवळ तातडीच्या प्रकरणावर ‘ऑनलाइन’ सुनावणी होत असल्यामुळे वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले.
न्यायालयात प्रकरण (याचिका) दाखल करणे, त्यात काही त्रुटी असल्यास त्याही दूर करणे, शपथपत्र इतर जोडपत्र आणि कॅव्हेट दाखल करणे, निबंधकाकडून सुनावणीच्या तारखा घेणे, याचिकेच्या सुनावणीस घरून अथवा आपल्या स्वतःच्या कार्यालयातूनच ‘ऑनलाइन’ हजर होणे, युक्तिवाद करणे आदी न्यायालयीन कामे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करावी लागली. यामुळे सर्व वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले.
मुंबई, औरंगाबाद, गोवा आणि नागपूर येथील अधिक अनुभवी आणि निष्णात वकिलांना तसेच राज्य शासनाच्या वतीने महाधिवक्ता आणि केंद्र शासनाच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल यांना इतर खंडपीठात ‘ऑनलाइन’ हजर होणे शक्य झाल्यामुळे त्याचप्रमाणे शासनाचे म्हणणे तात्काळ दाखल करता आल्यामुळे वेळेची बचत झाली. प्रकरणे तात्काळ निकाली निघाली. नांदेड येथील गुरुद्वारातर्फे दसऱ्याला निघणाऱ्या धार्मिक मिरवणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य शासनापुढे तिसऱ्या दिवशी औरंगाबाद खंडपीठात आणि सुटीच्या दिवशी, न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतरसुद्धा ‘ऑनलाइन’ सुनावणी होऊन प्रकरण निकाली निघाले.
इतर न्यायालयात चालू असलेल्या ज्वलंत प्रश्न आणि तातडीच्या प्रकरणावरील सुनावण्यांची नियमित माहिती घेणे शक्य झाले.
केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत असल्यामुळे दीर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणे निकाली निघू शकली नाहीत.
(शब्दांकन - प्रभुदास पाटोळे)