‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:17 AM2019-07-11T00:17:42+5:302019-07-11T00:18:07+5:30
शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.
औरंगाबाद : शहरात पावसाचा थेंबही पडत नाही तोच वीज गुल होते. पावसात वीजपुरवठा खंडित होण्यामागे महावितरणकडून अनेक कारणे सांगितली जातात. त्यात बुधवारी अजब कारभार पाहायला मिळाला. एका ग्राहकाने वीज गेल्यानंतर महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला तेव्हा, चक्क ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असे उत्तर देण्यात आले. त्यामुळे यापुढेही वीजग्राहकांना अन्य काही कारण सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.
भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य लढत बुधवारी झाली. हा सामना शेवटच्या टप्प्यावर असताना भारत पराभूत होतो का विजयी होतो, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली होती. नेमक्या त्या वेळी शहरात पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे पावसाच्या आगमनाने विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला. उल्कानगरी परिसरातील वीजही गुल झाली होती. त्यामुळे रहिवासी सचिन ताम्हाणे यांनी महावितरणच्या ०२४०-२२४०१०८ या फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क साधला व ‘वीज कधी येणार’,अशी विचारणा के ली; परंतु समोरून मिळालेले उत्तर ऐकून ते चक्रावून गेले. ‘मॅच हरतोय, वीज गेली तर बिघडले काय?’ असा उलट प्रश्न त्यांना करण्यात आला. या प्रकाराविषयी ताम्हाणे यांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती त्यांनी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने या क्रमांकावर संपर्क साधून झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. मात्र, या क्रमांकावर कोण-कोण बोलतात, हे सांगता येणार नाही. दुपारपर्यंत नियमित कर्मचारी असतात. त्यानंतर लाईन स्टाफ असतो. मी सबस्टेशन आॅपरेटर आहे. याविषयी मला काही सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले.
अपेक्षित उत्तर मिळावे
दोष असून वीज येण्यास वेळ लागेल अथवा काही मिनिटांत वीज येईल, असे उत्तर देणे अपेक्षित असते; परंतु अजब उत्तर देण्यात आले. अनेकदा तर दूरध्वनी उचलला जात नाही.
-सचिन ताम्हाणे, वीज ग्राहक