पंतप्रधान मोदींनी आपल्याला काय मंत्र दिला? भागवत कराडांनी एका वाक्यात सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:06 AM2021-07-10T11:06:20+5:302021-07-10T11:06:33+5:30
मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण अतिशय आवश्यक आहे. औरंगाबादेत आयआयटी सुरु झाले तर तेथे अनेक प्रकारचा औद्योगिक विकास होईल.
नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यात डॉ. भागवत कराड यांना अर्थमंत्रालयात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच भविष्यातील योजनांसह अनेक विषयांवर ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी नितीन अग्रवाल यांच्याशी मनमोकळी चर्चा केली...
- मंत्री झाल्यानंतर आपली प्राथमिकता काय?
मी महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील आहे आणि केंद्रीय स्तरावर मला जबाबदारी मिळाली आहे. विकासाच्या बाबतीत मराठवाडा बराच मागे आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मराठवाडा आणि औरंगाबादच्या समस्या व विकासाचे मुद्दे मी संसदेत मांडू इच्छितो. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मंत्रालयाच्या जबाबदाऱ्यांसोबत मराठवाड्याचा विकास ही माझी प्राथमिकता आहे. काही गोष्टी मी ठरविल्या आहेत ज्यामुळे मराठवाड्याचा विकास वेगाने होऊ शकेल.
- पंतप्रधान मोदी यांनी आणखी काय मंत्र दिला आपल्याला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी व्यक्ती आहेत. सब का साथ, सब का विकास हाच त्यांचा मूलमंत्र आहे. नवी जबाबदारी देताना त्यांनी आम्हाला केवळ एकच मंत्र दिला की, कर्तव्यनिष्ठेसोबत आपली जबाबदारी पार पाडा. मागास आणि गरिबांच्या विकासासाठी काम करण्यास सांगितले आहे. शपथ घेण्यापूर्वी आणि पद स्वीकारल्यानंतरही त्यांनी केवळ आणि केवळ विकास आणि जनकल्याणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
- महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत काय सांगाल?
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमुळे लोक पूर्णपणे त्रस्त आहेत. भाजप- शिवसेना युतीसाठी मतदान झाले होते आणि लोकांना हे ठाऊक आहे की, शिवसेनेने कशाप्रकारे तो विश्वास तोडून हे सरकार स्थापन केले आहे. जनतेला या सरकारवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे या सरकारचे राजकीय भविष्य दीर्घकाळ आहे असे वाटत नाही.
- लोकमतच्या वाचकांसाठी काही संदेश?
लोकमत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य आणि खास अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा आवाज आहे. माझा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे याची माहितीही मला सर्वात अगोदर लोकमतकडून मिळाली. जनकल्याणाचे मुद्दे उपस्थित करण्यासोबतच समाज कल्याणाची जबाबदारीही लोकमतने समर्थपणे सांभाळलेली आहे. असे काम क्वचितच पाहायला मिळते. अलीकडेच लोकमतने पूर्ण महाराष्ट्रात रक्तदान मोहीम चालविली. जनकल्याणाबाबत असा विचार ठेवणाऱ्या लोकमतला माझ्या शुभेच्छा.
अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आवश्यक मानता?
मराठवाडा हा महाराष्ट्रातील सर्वात मागास भाग आहे. या भागाच्या विकासासाठी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण अतिशय आवश्यक आहे. औरंगाबादेत आयआयटी सुरु झाले तर तेथे अनेक प्रकारचा औद्योगिक विकास होईल. विशेष करुन ऑटोमोबाईल्स उद्योगाला बळ मिळेल. यामुळे मराठवाड्यात विकासाला वेग येईल. मी संसदेतही याबाबत मागणी केलेली आहे. दुसरी मोठी गरज आरोग्य सेवांची आहे.
- औरंगाबादेतील सरकारी रुग्णालयात १२ जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येतात. जर तिथे एम्ससारखे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल झाले तर उपचारासोबत या भागाचा विकासही होईल.
- देशात १२ एम्स उभारण्यासाठी पंतप्रधान स्वत: इच्छुक आहेत. नागपुरात एका एम्सची स्थापना यापूर्वीच झाली आहे. मी औरंगाबादसाठी आणखी एका एम्सची मागणी करेन.