स्वेच्छानिवृत्तीनंतर काय करणार? अखेर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी केला उलगडा...
By बापू सोळुंके | Published: June 30, 2023 08:45 PM2023-06-30T20:45:38+5:302023-06-30T20:46:30+5:30
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे ४ जुलै रोजी प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: शासनाने स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर केल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ३ जुलै रोजी प्रशासकीय सेवेतून मुक्त होत आहेत. स्वेच्छानिवृत्तीनंतर काय करायचे असा कोणताही प्लॉन नसल्याचे आणि शेती करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनास २५आणि २६मे रोजी दिलेला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला होता. हा अर्ज दोन दिवसापूर्वी शासनाने मंजूर केला. केंद्रेकर हे ४ जुलै रोजी प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त होत आहेत. यापार्श्वभूमीवर पत्रकारांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या कारणाविषयी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र स्वेच्छा निवृत्तीनंतर काय प्लॉन आहेत. काय करणार आहात, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, निवृत्तीनंतर काय करायचे याचा कोणताही प्लॉन आपण केला नाही. मात्र शेती करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सेवेत आहेत, तोपर्यंत आपल्यासमोर येणारे सर्व विषय हाताळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुंबईला जाऊन आलेले केंद्रेकर शुक्रवारी सकाळपासून कार्यालयात होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दौऱ्यानिमित्त शहरात आले असता चिकलठाणा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी केंद्रेकर उपस्थित होते. यानंतर ते कार्यालयात आले आणि त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकांना ते भेटले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.