समृद्धी महामार्गावर मदत लागल्यास काय करणार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर, सोयीसुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:57 PM2022-12-19T17:57:41+5:302022-12-19T18:00:32+5:30
समृद्धी महामार्गावर सुरक्षा यंत्रणेचे २४ तास लक्ष, प्रवाशांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी रुग्णवाहिका, पेट्रोलपंप सज्ज
औरंगाबाद : हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरुन दररोज सरासरी 10 ते 12 हजार वाहने प्रवास करत आहेत. येत्या काळात ही संख्या वाढणार असून महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रस्ते विकास महामंडळामार्फत उपाययोजना केलेल्या आहेत. अपघातग्रस्तांना मदत, नियंत्रण कक्ष, इंधन सुविधा, इंटरचेंजवर २१ ठिकाणी शीघ्र प्रतिसाद वाहने सज्ज असल्याची माहिती मुख्य अभियंता बी. जी. साळुंके यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गामुळे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. टकाटक असलेल्या या महामार्गावर काही वाहनचालक वेगमर्यादेपेक्षाही अधिक वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये जवळपास ३० वाहनांना अपघात झाला आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने साशंक आहेत. या पार्श्वभूमीवर रस्ते विकास महामंडळामार्फत प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावर वेग आवरा; सात दिवसांत ३० अपघात, सहा वन्यप्राण्यांचाही गेला जीव
अपघातग्रस्तांसाठी १५ रुग्णवाहिका
महामार्गावर अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहन बाजूला नेण्यासाठी १३ ठिकाणी क्रेनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्णवाहिका सज्ज आहेत. तसेच रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधता येतो.
सुरक्षा यंत्रणांचे २४ तास महामार्गावर लक्ष
नियंत्रण कक्षातून 24 तास सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जाते. राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षारक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त आहेत. वाहनांचा बिघाड, अपघात झाल्यास २४ तास हेल्पलाईन क्रमांक 1800 233 2 233 व 81 81 81 81 55 कार्यरत असून हे क्रमांक महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी असलेली स्वंतत्र नियंत्रणप्रणाली औरंगाबादजवळील सांवगी इंटरचेंज येथील मुख्य नियंत्रण कक्षासोबत जोडलेले आहेत.
१३ ठिकाणी पेट्रोल पंप, प्रसाधन गृह
नागपूरहून शिर्डीच्या दिशेने 7 ठिकाणी तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने जातांना 6 ठिकाणी अशा एकूण 13 ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह, खानपान सेवा, वाहनांची किरकोळ दुरुस्ती आणि टायर पंक्चर काढण्याची सुविधा सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
वाहतूक नियमांचे पालन करावे
अतिवेगामुळे काही ठिकाणी अपघात झालेले आहेत. प्रवास करण्यापूर्वी चालकांनी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री करावी. तसेच प्रवासादरम्यान वाहनाची गती मर्यादित ठेवून लेनची शिस्त पाळावी. दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवत चूकीच्या बाजूने वाहने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये, सीट बेल्टचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी.पी.साळुंके यांनी केले आहे.