दूध शीतकरण केंद्रास घरघर
By Admin | Published: June 16, 2014 12:25 AM2014-06-16T00:25:10+5:302014-06-16T01:16:55+5:30
उमरगा : गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धविकास विभागाने पाठ फिरविल्याने या दुग्ध शितकरण केंद्रास शासकीय उदासिनता निर्माण झाली
उमरगा : गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राकडे शासनाच्या दुग्धविकास विभागाने पाठ फिरविल्याने या दुग्ध शितकरण केंद्रास शासकीय उदासिनता निर्माण झाली असून, तालुक्यातील हजारो दुग्ध उत्पादकांना आर्थिक दिलासा देणाऱ्या येथील दूध शितकरण केंद्रास अखेरची घरघर लागली आहे.
तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी १९८२ साली पतंगे रोड भागातील खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये दुध शितकरण केंद्राची उभारणी करण्यात आली. दहा वर्षानंतर सदरचे केंद्र राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खरेदी विक्री संघाच्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. खाजगी दुग्ध संकलन केंद्राच्या स्पर्धेमुळे या दूध केंद्राला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या केंद्रात रसाय्न तंत्रज्ञ, व्यवस्थापक, दूधसंकलन पर्यवेक्षक, लिपिक प्रयोगशाळा सहायक, दूध परिचर अशी ११ कर्मचाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. उत्पादनापेक्षा या केंद्राच्या व्यवस्थापनावर जास्तीचा खर्च केला जात आहे. वीजबिल, कर्मचारी वेतन, किरकोळ दुरुस्ती यावर पलतवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. २००९ साली बंद पडलेले हे केंद्र आ. चौगुले, प्रा. गायकवाड यांच्या प्रयत्नानंतर चालू झाले. या केंद्राअंतर्गत एकेकाळी आठ ते दहा हजार लिटर दुधाचे संकलन केले जात होते. मात्र खाजगी दूध संकलन केंद्रामध्ये उत्पादकांच्या दुधाला चांगली किंमत मिळत असे. खाजगी संकलन केंद्रात २५ रुपयाने तर शासकीय दूध संकलन केंद्रात २० रुपये लिटरने दूध खरेदी होत होती. दुधातील स्रिग्धता न बघता खाजगी दूध संकलन केंद्राकडून दुधाची खरेदी होत असल्याने या शासनाच्या दूध डेअरीकडे दूध उत्पादकांनी पाठ फिरविली आहे. या दूध केंद्राला कासारशिरसी, मातोळा, मुळज, येणेगूर या खाजगी दूध संकलन केंद्राच्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
एकूणच सद्यस्थितीत जागेची अडचण खाजगी दूध संकलन केंद्राच्या तुलनेत मिळणारे प्रतिलिटर दुधाचे दर यामुळेच या दुध संकलन केंद्राकडे दुग्ध उत्पादकांनी पाठ फिरविल्याने केंद्र अडचणीत आल्याचे दिसते. (वार्ताहर)
दूध केंद्र एमआयडीसीत हलवा
दूध शितकरणास शहरात कोठेही सोयीस्कर जागा उपलब्ध होत नसल्याने सदरचे केंद्र येथील एमआयडीसी भागात स्थलांतरित करण्याची गरज आहे. दुग्ध उत्पादनवाढीसाठी दुग्धउत्पादकांना सवलतीच्या दराने गायी म्हशी द्याव्यात. कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी निवासस्थाने आधुनिक सुविधा, दूध उत्पादकांना वाढवून भाव दिल्यास समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या शासनाच्या या दूध शितकरण केंद्रास पुन्हा उभारी मिळेल, असे मत प्रमोद भोसले यांनी व्यक्त केले आहे.
लाखो रुपयांची मशिनरी धूळखात
या दूध केंद्रात दूध शितकरणासाठी दोन शितकरण टाकी पाच हजार लिटर क्षमतेची दूध साठवण टाकी, जनरेटर, दूध तपासणी प्र्रयोगशाळा सामुग्री, २५ ते ३० लाखाचे साहित्य अपुऱ्या दूध संकलनामुळे योग्य वापराअभावी धूळखात पडून आहे.
महिनाभरात इमारत रिकामी करा
१९९१ पासून येथील खरेदी विक्री संघाच्या जागेत उभारण्यात आलेल्या या शितकरण केंद्रास एक महिन्याच्या आत जागा रिकामी करण्याची नोटीस खरेदी विक्री संघाच्या वतीने दिली आहे. स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने सदरचे दूध शितकरण केंद्र आता कुठे स्थलांतरित करायचे? असा सवाल दुग्धविकास प्रशासनाला पडला आहे.