बदलत्या हवामानामुळे गव्हाची वाढ खुंटली .
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:10+5:302021-01-03T04:07:10+5:30
बाजारसावंगी : हवामानात रोजच होत जाणाऱ्या बदलामुळे गव्हाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे येत्या काळात उत्पादनात देखील घट होणार ...
बाजारसावंगी : हवामानात रोजच होत जाणाऱ्या बदलामुळे गव्हाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे येत्या काळात उत्पादनात देखील घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
एक आठवडा हिवाळा तर दुसऱ्या आठवड्यात उन्हाळा असे विचित्र बदल वातावरणात होऊ लागले आहेत. त्यामुळे रब्बी पिकांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षभरात कापूस, मका पीक हातातून गेल्याने आधीच शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यात रब्बी पेरणी करून गहू, हरभरा हे तरी साथ देतील अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात होत असलेले विचित्र बदल हे पिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. त्यात विशेष करून गव्हाच्या निकोप वाढीसाठी थंडी अत्यावश्यक असते. त्यात थंडी गायब झाल्यामुळे गव्हाच्या पिकांची वाढ खुंटलेली आहे. कमी उंचीतच लहान लहान ओंब्या लगडल्याने पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
रोगाचा प्रादुर्भाव
थंडी गायब व विचित्र बदलणाऱ्या हवामानामुळे गहू, हरभरा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महागडी रासायनिक औषधीची फवारणी करूनही पिकांवरील किड आटोक्यात येत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. हरभरा पिकांना फुले लगडत असून थंडी गायब झाल्यामुळे हरभरा घाट्याला अळी व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
---------------
फोटो :
बाजारसावंगी परिसरात दररोज बदलणाऱ्या विचित्र हवामानामुळे गव्हाची वाढ खुंटली असून मावा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.