दुष्काळाच्या फटक्याने महिनाभरात आटोपणार मक्याचा हंगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:06 PM2018-10-26T16:06:53+5:302018-10-26T16:07:32+5:30
यंदा मक्याचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटले आहे.
औरंगाबाद : खरीप हंगामात जाधववाडीतील धान्याच्या अडत बाजारात होणाऱ्या एकूण आवकपैकी ७५ टक्के आवकही मक्याची होत असते. मक्यामुळेच येथील अडत बाजार टिकून आहे; पण यंदा मक्याचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक उत्पादन घटले आहे. यंदा आणखी जेमतेम महिनाभरच हंगाम सुरू राहणार आहे. यामुळे अडत बाजार आर्थिक संकटात अडकला आहे.
मक्याचा हंगाम १ आॅक्टोबरपासून सुरू होत असतो. दोन वर्षांपूर्वी जाधववाडीतील अडत बाजारात या हंगामात दररोज ४ ते ५ हजार क्विंटल मक्याची आवक होत असे. आजघडीला ८०० ते १००० क्विंटल मका येत आहे. मागील हंगामात अडत बाजारात एकूण ६० हजार ८२५ क्विंटल मक्याची आवक झाली होती. ६० टक्के उत्पादन कमी व होणारी आवक लक्षात घेता जेमतेम नोव्हेंबरअखेरपर्यंत यंदा मक्याची आवक राहील, असे अडत व्यापाऱ्यांनी सांगितले. मका व काही प्रमाणात तुरीच्या आवकवरच जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार टिकून आहे. पण मका व तुरीचे उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत घटल्यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे.