रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशले; औरंगाबादेतील अभियंत्याचा रेल्वेतून प्रदूषणमुक्त वीजनिर्मिती दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:43 PM2018-11-27T15:43:54+5:302018-11-27T15:56:19+5:30
कोट्यवधींचा इंधन व विजेवर होणारा खर्च टाळण्याचे यशस्वी संशोधन केल्याचा दावा औरंगाबादेतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने केला.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : कोट्यवधींचा इंधन व विजेवर होणारा खर्च टाळण्याचे यशस्वी संशोधन केल्याचा दावा औरंगाबादेतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने केला. रेल्वेचे देशभर पसरलेले जाळे अन् रेल्वे रुळांवर धावताना त्यातून निर्माण झालेली वीज महावितरणला देण्याची ही त्याची कल्पना आहे.
मेकॅनिकल इंजिनिअर विजेंद्र रोजेकर व त्यांचा मित्र संजय मुथियान हे १० वर्षांपासून यावर प्रयोग करीत आहेत. या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार डिझेल, कोळसा, पाणी, तसेच विकत घेण्यात येणारी वीज, असा एकूण अब्जावधी रुपयांचा खर्च यातून वाचविणे शक्य आहे. रेल्वेने आता सोलार सिस्टीम पॅनल बसवून, तसेच रेल्वे प्लॅटफार्मवर प्रवाशांच्या येण्या-जाण्यामुळे वीजनिर्मितीचा प्रयोग सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेमार्गात असलेल्या भुयाराच्या तोंडावर पवन चक्की बसवून हवेच्या दाबातून पवनऊर्जा देऊ शकते, किती रेल्वे येणार आणि जाणार तेवढीच वीज मिळेल. सूर्यप्रकाशामुळे सौरऊर्जा तयार होईल; परंतु एक रेल्वे दिवसभरातून किमान २० तास धावत राहणार. त्यातून विशिष्ट पद्धतीने तयार झालेली वीज रेल्वेच्या स्वयंचालण्यासाठी अधिक फायद्याची ठरणार, तसेच उर्वरित वीज रेल्वे वीज केंद्राला परत देऊ शकते.
लोडशेडिंगची झंझट दूर होणार
रेल्वेच्या प्रत्येक डब्यातून वीज तयार होऊन त्यातून रेल्वे इंजिनला पुरवून ती प्रवाहित तारांच्या माध्यमातून परत वीज केंद्रात जमा होऊ शकते. खेड्यात तसेच निवासी वसाहतीत लोडशेडिंगची झंझटच यातून निकाली निघण्याची संकल्पना मुथियान व रोजेकर यांनी मांडली.
रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशमान झाले
एमआयडीसी वाळूज येथे एका शेडवर दोघांनी आपली कल्पनाशक्ती वापरून मागील ८ ते १० वर्षांपासून विविध प्रकारची साधने वापरून वीजनिर्मितीचा प्रयोग केला. रेल्वेच्या प्रतिकृतीचे इंजिन, तसेच बोगी (डबा) तयार केला. त्याची रुळावर प्रायोगिकतत्त्वावर चाचणी घेतली. बॅटरी किंवा फ्युएलवर ही रेल्वे स्टार्ट केली की, काही क्षणांत जनरेटरच्या मदतीने वीजनिर्मिती होते. गतीनुसार तिच्या आकडेवारीचे टिपणदेखील पॅनल बोर्डवर दाखवले जाते. हे तंत्रज्ञान रेल्वे व वीज मंडळाने स्वीकारल्यास महसुलाची मोठी बचत होऊन त्याचा फायदाही होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.