सुमेध वसतिगृहात सुविधा कधी?

By सुमेध उघडे | Published: November 7, 2017 12:20 AM2017-11-07T00:20:26+5:302017-11-07T12:25:59+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचे सुप्रसिद्ध ‘सुमेध वसतिगृह’ मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.

 When facilities will be available in Sumedh hostel ? | सुमेध वसतिगृहात सुविधा कधी?

सुमेध वसतिगृहात सुविधा कधी?

googlenewsNext

- सुमेध उघडे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयाचे सुप्रसिद्ध ‘सुमेध वसतिगृह’ मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. एकेकाळी वैभव अनुभवलेल्या या वास्तूला लागलेली घरघर चिंताजनक असून, हे विदारक चित्र कसे बदलणार, असा प्रश्न सर्वसामान्य आंबेडकरी अनुयायांकडून उपस्थित होत आहे. याबाबत प्राचार्यांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन वसतिगृहात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याची भूमिका विद्यार्थी संघटना व विचारवंतांनी मांडली आहे.

मागील काही वर्षांपासून संस्थेत न्यायालयीन वाद सुरू आहे; परंतु बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन येथे शिक्षणासाठी आलेला गोरगरीब घरचा विद्यार्थी यात भरडला जात आहे. नागसेनवन परिसरातील बाबासाहेबांच्या स्मृती येथील विद्यार्थ्यांना कायम प्रेरित करतात. याच कारणाने हे विद्यार्थी अल्प सुविधा असूनही त्याबाबत कधी तक्रार करीत नाहीत. ‘नागसेनवनाचे नाव खराब झाले, म्हणजे बाबासाहेबांच्या नावाची बदनामी’ असा भावनिक, पण दूरचा विचार हे विद्यार्थी करतात. यामुळेच काळ सोकावत गेला आणि हे वसतिगृह असुविधांचे माहेरघर झाले.

कोण घेणार जबाबदारी?
जंगलात एखाद्या निर्जनस्थळी असलेल्या वास्तूत जशा मूलभूत सुविधाही नसतात तसे हे वसतिगृह झाले आहे. अधिक वेळ न घालता आता याच्या सुधारणेच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांचा थेट संबंध महाविद्यालयाशी येत असल्याने प्राचार्यांनीच याकडे गांभीर्याने पाहायला हवे. तात्काळ चित्र बदलणारे नसले तरी किमान मूलभूत सुविधा कशा मिळतील, यावर त्यांनी प्राधान्यांनी काम करावे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिल्या आहेत. या परिसराचे महत्त्व ओळखून बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य करण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडावी. बाबासाहेबांचा दृष्टिकोन कायम विद्यार्थिकें द्रित होता, यामुळे ही परिस्थिती न सुधारल्यास आंबेडकरी अनुयायी या अनास्थेच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याससुद्धा मागे पाहणार नाहीत, असे मत आंबेडकरी विचारवंतांनी व्यक्त केले.

प्राचार्यांनी जबाबदारी घ्यावी

संस्थेच्या अंतर्गत वादाने येथील प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. वसतिगृहाची संस्कार केंद्रे असावीत हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यावर ठोस भूमिका घेत वसतिगृहाच्या सुधारणांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांचे पालक म्हणून वसतिगृहाची डागडुजी करणे व काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी आहे.
- अविनाश डोळस, साहित्यिक व आंबेडकरी विचारवंत 

प्राचार्यांना खुर्चीवर बसू देणार नाही 
विद्यार्थी मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत. प्राचार्यांनी त्या तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा त्यांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही.
- प्रकाश इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन 

आंदोलन करणार 
वसतिगृहाच्या स्थितीमध्ये सुधारणेसाठी आम्ही तीव्र आंदोलन करू, तसेच या परिसरात आम्ही लवकरच स्वच्छता मोहीम राबवणार आहोत.
-  अमोल दांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

खोलीनिहाय काम सुरू 
आमचा येथील विद्यार्थ्यांशी कायम संपर्क  असतो. आम्ही वसतिगृहातील खोलीनिहाय प्रत्येक विद्यार्थ्याला मुबलक सुविधा कशा मिळतील याचे पूर्वीच काम सुरू केले आहे. 
- सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना 

Web Title:  When facilities will be available in Sumedh hostel ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.