छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी? किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार?
By संतोष हिरेमठ | Published: February 7, 2024 08:14 PM2024-02-07T20:14:45+5:302024-02-07T20:14:57+5:30
मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ कि.मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले आहे. या दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पात २१४ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे आता लक्ष लागले आहे.
अमृत चतुर्भुज कॉरिडॉर योजनेत छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा प्रस्ताव असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर सुरू आहे. यासंदर्भात एक नकाशाही व्हायरल होत आहे. नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली. मालवाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेल्या रेल्वे कॉरिडॉरशिवाय ऊर्जा, खनिज व सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि उच्च रहदारी घनता कॉरिडॉरची घोषणा केली.
मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड-परभणी या एकेरी मार्गाचे विद्युतीकरण मार्गी लागले. कॉरिडॉर योजनेत छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण असल्याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नाही.
१९३ कि.मी. चा मार्ग
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड या २९१ किलोमीटर अंतराच्या लोहमार्गाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने दुहेरीकरणाची आवश्यकता नसल्याचे उत्तर यापूर्वी लोकसभेतील प्रश्नोत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले होते, मात्र त्याचवेळी अंकाई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. आता परभणी-छत्रपती संभाजीनगर या १९३ कि.मी. रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण कधी होणार, असा प्रश्न आहे.