"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 09:08 PM2024-05-01T21:08:47+5:302024-05-01T21:11:57+5:30
"चंद्रकांत खैरे यांच्या त्या विधानानंतर, शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, पत्रकारांसोबत बोलताना, 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी', असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती...
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. येथे प्रचारासाठी आता केवळ 10 दिवस उरले आहेत. यातच, महाविकास आघाडी तथा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी पाच वेळच्या नमाजसंदर्भात एक वक्तव्य केले होते. यानंतर विरोधकांनी त्यांना ट्रोलही केले. त्यांच्या या विधानानंतर, शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, पत्रकारांसोबत बोलताना, 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी', असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. आता यासंदर्भात बोलताना, 'त्याचे सगळे लफडे काढतो. कुठूण आणले पैसे? कुठे गेले? हे सर्व मी काढणार आहे. सोडणार नाही आता त्याला,' असे खैरे यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या त्या वक्तव्यानंतर, आमदार संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमातही खैरे यांच्या त्या वक्तव्याची क्लिप ऐकवत, त्यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "संजय शिसराट हे गद्दार आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा झाला आहे. या पैशांच्या जोरावर ते फिरतात आणि दादागिरी करतात. हरकत नाही, थोड्या दिवसांसाठी आहे. मात्र कसे असता ना की, मी पाहिलेले आहे. मात्र आता तो विषय काढण्याची आवश्यकता नाही. मात्र आपण सर्वांनी आपापल्या धर्माचा अभिमान बाळगायला हवा. पूजा पाठ करायला हवे. जसे मी करतो. म्हणजे मनाला शांती मिळते आणि आपला उत्कर्ष होतो, सर्व बंधूभावाने राहतात ही भूमिका माझी आहे. बाकी काही नाही. या जिल्ह्यात शांतता असावी. जसे मी गेल्या अठ्ठावीस वर्षांत येथे काहीच होऊ दिले नाही. शांतता होती सर्व एकदम प्रगतिशील होते. तसे आताही व्हायला हवे. म्हणून मी आत्तापासूनच प्रयत्न करत आहे."
संजय शिसराट यांच्या 'जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी' या वक्तव्यासंदर्भात टीव्ही 9 सोबत बोलताना खैरे म्हणाले, "थांबा जरा बघतो त्याची गम्मत, सगळे लफडे काढतो त्याचे. कुठूण आणले पैसे? कुठे गेले? 72 वा मजला, हे सर्व मी काढणार आहे. सोडणार नाही आता त्याला. त्याच्यासाठी मी आदल्या दिवशी अडीच हजार फोन केले होते आणि तो निवडून आला. तो तर घरी बसला होता. टेन्शन लेने का नाही, असे म्हणायचा तो लोकांना. मी अडीच हाज फोन केले तेव्हा तो निवडून आला. तोही मान्य करतो. नसेल मान्य करत तर, लोकं मान्य करतात ना. कारण प्रत्येकाला मी फोन केले. आज तो एवढ्या मस्तीत आला आहे, मस्तीत आहे तो. आता भुमरेकडे का तो, तर भुमरेंकडून काय मिळतं ते घ्यायचं."