पॉझिटिव्ह रुग्ण दुचाकीवर शहरात फिरतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:56+5:302021-03-06T04:04:56+5:30
औरंगाबाद : शहरात दररोज तीनशेपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. यांतील बहुतांश रुग्ण दुचाकी वाहनांवर राजरोसपणे महापालिकेच्या एका ...
औरंगाबाद : शहरात दररोज तीनशेपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. यांतील बहुतांश रुग्ण दुचाकी वाहनांवर राजरोसपणे महापालिकेच्या एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर फिरत आहेत. शहरातील किती नागरिकांमध्ये हे पॉझिटिव्ह रुग्ण संक्रमण पसरवीत आहेत याचा कोणताही अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाला आलेला नाही. स्रावाचा नमुना देऊन घरी गेलेला संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.
महापालिकेची सर्व कोविड केअर सेंटर हाऊसफुल्ल झाली आहेत. मागील तीन दिवसांपासून ही गंभीर अवस्था असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्यायी कोविड सेंटर सुरू केली नाहीत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पॉझिटिव्ह रुग्ण फिरत असल्याचे वृत्त शुक्रवारी 'लोकमत'ने प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने युद्धपातळीवर सिपेट आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात आणि मुलींच्या वसतिगृहात २३० खाटांची व्यवस्था करण्यात आली. सकाळपासून पॉझिटिव्ह येत असलेले रुग्ण याच ठिकाणी नेण्यात येत आहेत. सिपेट येथेही तातडीने २७० बेडची व्यवस्था करण्यात आली.
कोरोनाची लक्षणे दिसून येतात. अनेक नागरिक महापालिकेच्या वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन स्रावाचे नमुने देत आहेत. नमुना दिल्यानंतर रुग्ण घरी जातो. त्याच्या हातावर क्वारंटाईन केलेला शिक्काही मारण्यात येत नाही. दुसऱ्या दिवशी संबंधित रुग्णाला ते पॉझिटिव्ह आहेत तेवढेच कळविण्यात येते. महापालिकेच्या कोणत्या केंद्रावर जाऊन दाखल व्हावे हे सांगितले जात नाही. रुग्णाला संबंधित केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही व्यवस्था नाही.
एका रुग्णाची झाली अशी पंचाईत
नक्षत्रवाडी येथील रहिवासी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. त्यांनी गुरुवारी पद्मपुरा येथे स्रावाचा नमुना दिला होता. शुक्रवारी सकाळी त्यांना पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी दुचाकीवर एमआयटी येथील महापालिकेचे केंद्र गाठले. तेथे बेडच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तेथून ते दुचाकीवरून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गेले. तेथे त्यांना दाखल करून घेण्यात आले.
रुग्णाच्या घरावर स्टिकरसुद्धा नाही
महापालिकेने मागील आठवड्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरावर स्टिकर चिकटविण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र शहरात एकाही रुग्णाच्या घरावर स्टिकर लावण्यात येत नाही. शेजारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे संबंधितांना कळतसुद्धा नाही. स्टिकर लावण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी दिले.